आमची भूमिका सहकार्याचीच : हिंदू जनजागृती समिती
By Admin | Updated: July 24, 2015 00:53 IST2015-07-24T00:45:20+5:302015-07-24T00:53:43+5:30
पुरातत्व खात्याकडे आणि श्रीपूजकांनाही मूर्ती बदलण्याची मागणी पत्राद्वारे केली होती; पण अडवणूक केलेली नाही.

आमची भूमिका सहकार्याचीच : हिंदू जनजागृती समिती
कोल्हापूर : कोणत्याही देवतेची मूर्ती भंग पावली तर त्याजागी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, असे शास्त्र सांगते ही भूमिका आम्ही पुरातत्व खात्याकडे मांडली होती. याचा अर्थ आम्ही अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन करू देणार नाही, असा नाही. पुरातत्व खात्याने कोणतीही चर्चा न करता परस्पर कोल्हापुरात न येण्याचा निर्णय का घेतला हे माहीत नाही; पण आमची भूमिका नेहमी सहकार्याचीच असणार आहे, असा खुलासा हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पुरातत्व खात्याला रासायनिक संवर्धनाच्या विरोधात पत्र पाठवल्यानंतर पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी श्रीपूजकांना बुधवारी अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्यासाठी आम्ही कोल्हापुरात येऊ शकत नाही, असे दूरध्वनीवर कळविले होते. शिंदे म्हणाले, ‘निर्णयसिंधू’ आणि ‘प्रतिष्ठामोप्तीकम्’ या दोन ग्रंथांमध्ये देवतेची मूर्ती कधी बदलावी, याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याकडे आणि श्रीपूजकांनाही मूर्ती बदलण्याची मागणी पत्राद्वारे केली होती; पण अडवणूक केलेली नाही. तसे पत्रक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी घेणार आज बैठक
या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सैनी यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. पुरातत्व खात्याचे अधिकारी रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी आले नाही तर आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता देवस्थान समिती, श्रीपूजक व हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली.