विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राज्यातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीत दररोज खटके उडताना दिसत आहेत. त्यात विधानसभेतील पराभवानंतर धक्का बसलेल्या शिवसेना ठाकरे गटामध्येही सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यात आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या व्हायरल होत असलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमामध्ये भास्कर यादव यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भाष्य करताना आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झाली आहे, असं विधान केलं.
भास्कर जाधव म्हणाले की, पदांचा म्हणजे शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी जर निश्चित केला. तर तेवढ्या कालावधीमध्ये काम करण्याकरिता ते स्पर्धा करतील. नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. हे बोलताना वेदना होतात, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, एखाद्या गावात शिवसेनेचा कार्यक्रम असला की त्या गावातील शाखाप्रमुखाच्या अंगात संचार झालेला असायचा. आज शाखाप्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठे आहेत, याचा पहिल्यांदा आढावा घ्या. काही काही पदाधिकारी दहा दहा पंधरा पंधरा वर्षांपासून एका जागेवर मस्तपैकी बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही, असा त्यांचा समज झालेला आहे. मी कुठल्यातरी नेत्याची मर्जी सांभाळली की, माझं पद शाबूत, आहेत कुठे हे शाखाप्रमुख? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.