...नाहीतर तुमचे नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन; शिक्षक भरतीवरून महिलेला केसरकरांची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 23:17 IST2023-11-26T23:15:42+5:302023-11-26T23:17:06+5:30
एकीकडे नोकर भरती होत नाहीय, दुसरीकडे भरती काढली तरी त्याची प्रक्रिया पुढे सरकत नाहीय. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही वाट पाहतोय. वेबसाईट सुरु झाली, रजिस्ट्रेशनही सुरु झालेय, परंतू प्रोसिजर पुढे जात नाहीय, अशी तक्रार घेऊन एक भावी शिक्षिका तिथे आली होती.

...नाहीतर तुमचे नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन; शिक्षक भरतीवरून महिलेला केसरकरांची धमकी
शिक्षक भरतीवरून बीडमध्ये शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज एका महिला उमेदवाराला तुमचे नाव घेऊन तुम्हाला डिसक्वालिफाय करायला लावेन, अशी धमकी दिली आहे. पत्रकारांशी मुलाखत सुरु असताना एका तरुणीने केसरकर यांना शिक्षक भरती कधी करणार असे विचारले असता केसरकर चांगलेच भडकलेले दिसले.
एकीकडे नोकर भरती होत नाहीय, दुसरीकडे भरती काढली तरी त्याची प्रक्रिया पुढे सरकत नाहीय. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही वाट पाहतोय. वेबसाईट सुरु झाली, रजिस्ट्रेशनही सुरु झालेय, परंतू प्रोसिजर पुढे जात नाहीय, अशी तक्रार घेऊन एक भावी शिक्षिका तिथे आली होती. परंतू, केसरकर यांनी तिला बेशिस्त वर्तन असे म्हणत चांगलेच झापले.
तुम्हाला अजिबात कळत नाही. शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमचा चॉईस दिला पाहिजे, असे केसरकर म्हणाले. यावर त्या तरुणीने जाहिरातच आली नाहीय, असे सांगितले. यावर त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितली आहे, असे केसरकर म्हणाले. यावर तिने कधीपर्यंत येणार असे विचारले असता केसरकरांनी ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी करू शकत नाही. तुम्ही कसे मुलांना शिकविणार? तुम्हाला माहितीये की साईट ओपन झालीय, मग तुम्ही कसे आला मला विचारायला. श्रद्धा आणि सबुरी, आज पाच वर्षांत कोणी भरती केली का? मी केली ना? मला तुम्ही नंतरही भेटू शकला असता, असा सवाल केसरकर यांनी केला.
साईट ओपन झालीय, मग तुम्ही कसे आला मला विचारायला? भावी शिक्षिका शिक्षणमंत्र्यांना साईट पुढेच सरकत नसल्याची व्यथा सांगत होती... केसरकरांची पत्रकारांना मुलाखत सुरु होती... #DeepakKesarkar#Beed#teacherRecruitment#EknathShinde@CMOMaharashtrapic.twitter.com/dQ8JGUK4PC
— Lokmat (@lokmat) November 26, 2023
याचबरोबर मी जेवढा प्रेमळ तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने विद्यार्थी महत्वाचा आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असेल मी ३० हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. परंतू, उद्या जर तुम्ही विद्यार्थ्यांना बेशिस्त शिकवणार असाल, मला शिस्तीने शिकविणारे शिक्षकच पाहिजेत. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही हे मला अजिबात मान्य नाही. मी तुमच्या तोंडावर सांगतो. विद्यार्थी हा उद्या महाराष्ट्राचे भवितव्य आहे, अजिबात मध्ये बोलायचे नाही, नाहीतर तुमचे नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन, अशी धमकी केसरकर यांनी त्या तरुणीला दिली.