ओशोंच्या इच्छापत्राचा वाद आता थेट उच्च न्यायालयात
By Admin | Updated: July 31, 2016 04:31 IST2016-07-31T04:31:15+5:302016-07-31T04:31:15+5:30
जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू रजनीश ओशो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले

ओशोंच्या इच्छापत्राचा वाद आता थेट उच्च न्यायालयात
दीप्ती देशमुख,
मुंबई- जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू रजनीश ओशो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून त्यांच्या इच्छापत्रावरून शिष्यांमध्ये नव्याने वाद सुरू झाले आहेत. इच्छापत्रावर बनावट सह्या केल्याच्या आरोपावरून ओशोंच्या एका शिष्याने इंटरनॅशनल फाऊंडेशन झुरीक, जर्मनी, पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रम आणि जगभरातील ओशोंच्या आश्रमावर नियंत्रण असलेल्या सहा शिष्यांना न्यायालयात खेचले आहे.
इच्छापत्रावर बनावट सह्या केल्याबाबत सहा जणांविरुद्ध दोन वर्षांपूर्वी तक्रार करूनही पुणे पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी ओशोंचे शिष्य आणि ओशो फ्रेंड्स फाऊंडेशनचे व्यवस्थापक योगेश ठक्कर यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.
रजनीश ओशो यांचा मृत्यू १९ जानेवारी १९९० मध्ये झाला. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल २३ वर्षांनी त्यांचे इच्छापत्र जाहीर करण्यात आले. या मृत्यूपत्राचे लाभार्थी स्वामी आनंद जयेश आणि स्वामी प्रेम निरेन हे आहेत. मात्र ओशोंची बनावट सही करण्याच्या कटात या दोघांसह स्वामी योगेंद्र आनंद, स्वामी अम्रितो, स्वामी मुकेश भारती आणि प्रमोद यांचा सहभाग आहे, असा आरोप १९७३ ते १९९४ पर्यंत ओशोंच्या सेवेत असणाऱ्या व ओशो फे्रंड्स
आॅफ फाऊंडेशनचे व्यवस्थापक योगेश ठक्कर यांनी याचिकेद्वारे केला आहे.
ओशोंचे इच्छापत्र या सहाही जणांनी जाहीर केल्यानंतर जर्मन, इटली, नवी दिल्ली आणि औरंगाबाद येथील हस्ताक्षर तज्ज्ञांना संबंधित कागदपत्रावरील सह्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. मात्र या चारी ठिकाणाहून संबंधित कागदपत्रांवरील सह्या ओशो यांच्या नसल्याचे निर्वाळा दिला, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे.
याचिकेनुसार, ठक्कर यांनी यासंबंधी १८ नोव्हेंबर २०१३ रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावर तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. मात्र यावर काहीही तपास केला नाही आणि संबंधितांवर काहीही कारवाई केली नाही.
‘आरोपींनी पोलीस तपास पुढे सरकून दिलेला नाही. कोरेगाव पोलीस हातावर हात ठेवून बसले आहेत. तसेच आरोपींनी ट्रस्टच्या पैशातून अनेक कंपन्या स्थापल्या असून आंतरराष्ट्रीय पातळीवर
पैशांचा व्यवहार होत असल्याने हा तपास पुणे पोलिसांच्या क क्षेत येऊ शकत नाही. त्यामुळे याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा’ अशी मागणी ठक्कर यांनी अॅड. प्रदीप हवनुर यांच्याद्वारे केलेल्या याचिकेत केली आहे.
>पेंटिंग्ज आणि कॅसेटस् विकल्या
याचिकेनुसार, या सहाही जणांनी ट्रस्टची कोट्यवधींची मालमत्ता हडप केली आहे. ओशोंच्या वस्तू, त्यांच्या सह्या असलेली वाचनालयातील पुस्तके, ओशोंच्या सह्या असलेली पेंटींग बेकायदेशीररीत्या भारताबाहेर विकण्यात येत आहेत. यातून कोट्यवधींचा नफा कमावला जात आहे. त्याशिवाय ओशोंनी लिहीलेली पुस्तके, त्यांच्या भाषणाच्या कॅसेट्स विकून त्याद्वारे मिळणारे उत्पन्नही या सहा जणांच्या खिशात जात आहे.
‘ओशोंच्या मृत्यूदिनी त्यांच्याबरोबर त्यांचे नेहमीचे डॉक्टर गोकुळ यांना स्वामी आनंद जयेश यांनी दूर ठेवले. ओशो यांना डॉ. गोकुळ यांच्याशी बोलूनही दिले नाही. ओशोंच्या मृत्यूवेळी केवळ त्याठिकाणी स्वामी आनंद जयेश उपस्थित होते. त्यामुळे ओशोंच्या मृत्यूबाबतही त्यांच्या शिष्यांमध्ये गुढता आहे,’ असेही याचिकेत म्हटले आहे.
‘ओशोंचे इच्छापत्र त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल २३ वर्षांनी का समोर आणण्यात आले. ओशोंचे इच्छापत्र खरे होते तर ते त्यांच्या मृत्यूनंतर का समोर आणण्यात आले नाही?’ असा प्रश्नही याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.