विक्रमगडचे विश्वनाथ कारसेवेमुळे अनाथ

By Admin | Updated: May 17, 2014 02:07 IST2014-05-17T02:07:18+5:302014-05-17T02:07:18+5:30

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी पैशाच्या जोरावर धावणार्‍या मनसेच्या इंजिनाला एकीकडे बे्रक लावून सुरेश म्हात्रेंचा खर्‍या अर्थाने ‘मामा’ केला़

Orphaned by Vishwanath Karseva of Vikramgad | विक्रमगडचे विश्वनाथ कारसेवेमुळे अनाथ

विक्रमगडचे विश्वनाथ कारसेवेमुळे अनाथ

कष्टकरी मजुरांसह विणकर आणि शेतकर्‍यांचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी पैशाच्या जोरावर धावणार्‍या मनसेच्या इंजिनाला एकीकडे बे्रक लावून सुरेश म्हात्रेंचा खर्‍या अर्थाने ‘मामा’ केला़ तर दुसरीकडे राज्यातील बहुतेक पक्षांची प्रदक्षिणा घालून जातीचे कार्ड हातात घेऊन काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्‍या विक्रमगडच्या कुणबी सेनेच्या विश्वनाथ पाटलांना भिवंडीकरांनी ‘अनाथ’ केल्याचे निवडणूक निकालावरून दिसत आहे़ विश्वनाथ पाटलांच्या मदतीला ना कुणबी मते धावली ना मुस्लीम मते़ त्यातच भाजपाच्या वळचणीला असताना त्यांनी केलेली ‘कारसेवा’ भिवंडीतील कट्टर मुस्लीम मतदारांना रुचलेली दिसत नाही़ त्यांच्यासह भाजपाच्या कपिल पाटलांना काँगे्रसमधील सुरेश टावरेंसह राष्ट्रवादीनेही छुपा पाठिंबा दिल्याचे निकालावरून दिसत आहे़ विश्वनाथ पाटलांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँगे्रसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची कोकणातील पहिली प्रचार सभा भिवंडीत झाली होती़ परंतु, पाटलांना तिचा लाभ घेता आला नाही़ उलट तिकीट न मिळाल्याने नाराज मावळते खा. सुरेश टावरे यांनी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच हायजॅक करून त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई न केल्याने मतदार आणि मुस्लीम मतदारांत द्यायचा तो संदेश दिला. त्यांच्या कारसेवेचा मुद्दा ऐन प्रचाराच्या धामधुमीत भिवंडीच्या मुस्लीम वस्तीत चांगलाच रंगला होता़ प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत टावरे व त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नव्हते़ टावरे पॉवरलूम संघटनेचे अध्यक्ष असून, मुस्लीम समाजात त्यांचे वडिलोपार्जित जिव्हाळ्याचे संबंध आहेत़ याच समाजाच्या जोरावर ते गेल्या खेपेला निवडून आले होते़ परंतु, आता टावरेच प्रचारात नसल्याने काँग्रेसचे उमेदवार असूनही विश्वनाथ पाटलांना मुस्लिमांत कुणी विचारत नव्हते़ या समाजाची ४ लाख २६ हजार मते होती़ शिवाय कुणबी...कुणबी असा धोशा त्यांनी लावल्याने आगरी समाजासह भिवंडीत विणकर क्षेत्रातील दाक्षिणात्य मजूरवर्गानेही त्यांना भीक घातली नसल्याचे निकाल सांगत आहे़ जिल्ह्याचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांसह नंतर आलेल्या बंटी पाटलांकडून निवडणुकीसाठी लागणारी ‘माधुकरी’ हवी तशी मिळाली नसल्याचे दिसले़ तर मुरबाड-बदलापुरात मित्रपक्षाचे आमदार किसन कथोरेंचा ‘मी कुणबी’चा नारा थंड पडला होता़ एकीकडे समाजबांधवांची नाराजी, दुसरीकडे मुस्लीम आणि परप्रांतीय मतदारांची उदासीनता आणि अन्य समाजांत त्यांच्याबद्दलची अप्रियता पाहता विक्रमगडच्या या उपर्‍या पाटलांना मतदार भिवंडीचे नाथ होऊ देणार नाहीत, असे भाकीत ‘लोकमत’ने वर्तविले होते़ शिवाय क्रिकेट आणि कब्बडी खेळाडूंना रसद पुरविणार्‍या मनसेच्या सुरेश म्हात्रे यांचा कोणी केला ‘बाल्या’ तर कुणी केला ‘मामा’ हे वृत्तही तंतोतंत खरे ठरले आहे़

Web Title: Orphaned by Vishwanath Karseva of Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.