वर्षभरापासून अवयव प्रत्यारोपणाचा टक्का वाढला
By Admin | Updated: August 24, 2016 02:35 IST2016-08-24T02:35:20+5:302016-08-24T02:35:20+5:30
यंदा साडेसात महिन्यांतच अवयवदानाचा आकडा हा ४१वर पोहोचला आहे.

वर्षभरापासून अवयव प्रत्यारोपणाचा टक्का वाढला
मुंबई : यंदा साडेसात महिन्यांतच अवयवदानाचा आकडा हा ४१वर पोहोचला आहे. शनिवारी रात्री झालेल्या अवयवदानामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत गेल्यास त्या व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करणे शक्य असते. याविषयी गेल्या काही वर्षांपासून महापालिका आणि राज्य सरकार जनजागृती करीत आहे. गेल्या तीन वर्षांत या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
अवयवदानासाठी जनजागृती मोहिमेला यश आल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांत दिसत आहे. गेल्या वर्षी एकूण ४२ जणांनी अवयवदान केले होते.
यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंतच ४१ जणांनी अवयवदान केले आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत अजून अवयवदान होऊन आत्तापर्यंत सर्वाधिक अवयवदान या वर्षांत होईल अशी आशा मुंबईच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने व्यक्त केली आहे.
अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी मोठी आहे. पण, त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. नानावटी रुग्णालयात शनिवारी एका महिलेचे मूत्रपिंड दान केल्यामुळे
एका व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे.
गुरुवारी मालाड येथे ५५ वर्षीय महिलेला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला ब्रेन हॅमरेज झाले होते. उपचारादरम्यान या महिलेचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. एक मूत्रपिंड दान करण्यात आले. (प्रतिनिधी)