खून हा अपघात ठरवून विम्याची रक्कम देण्याचा आदेश
By Admin | Updated: November 22, 2014 03:10 IST2014-11-22T03:10:44+5:302014-11-22T03:10:44+5:30
अपघात विमा घेतलेल्या विमाधारकाचा खून झाला तरीही तो मृत्यू अपघातीच ठरतो, असा निकाल देऊन ग्राहक न्यायालयाने ठाण्यातील एका महिले

खून हा अपघात ठरवून विम्याची रक्कम देण्याचा आदेश
मुंबई: अपघात विमा घेतलेल्या विमाधारकाचा खून झाला तरीही तो मृत्यू अपघातीच ठरतो, असा निकाल देऊन ग्राहक न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेस तिच्या दिवंगत मुलाच्या विम्याची २ लाख रुपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.
कायद्याच्या परिभाषेत ‘अपघात’ या शब्दाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवून त्यात खुनाचाही अंतर्भाव करणारा हा पहिलाच न्यायालयीन निकाल मानला जात आहे. ठाणे (प.) राबोडी येथे वृंदावन सोसायटीजवळ राहणाऱ्या श्यामला रघुवीर प्रभू यांनी केलेली फिर्याद मंजूर करून दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एस.एम. रत्नाकर व सदस्य एस. जी. चाबुकस्वार यांनी हा निकाल दिला.
त्यानुसार नॅशनल इन्श्युरन्स कंपनीने विम्याची दोन लाख रुपयांची रक्कम जून २०१०पासूनच्या सहा टक्के व्याजासह श्यानला प्रभू यांना द्यायची आहे. याखेरीज दावा निकाली काढण्यास विलंबलावून मानसिक क्लेश दिल्याबद्दल चार हजार रुपये व न्यायालयीन खर्चापोटी तीन हजार रुपयेही विमा कंपनीने प्रभू यांना द्यायचे आहेत.
फिर्यादी श्यामला प्रभू यांचा मुलगा दिलीप याचा १८ सप्टेंबर १९९६ रोजी कल्याण रेल्वे स्टेशनवर खून झाला होता. विक्रोळी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या दिलीपने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे ‘क्लासिक क्रेडिट कार्ड’ घेतले होते व त्याचा अनुषंगिक लाभ म्हणून बँकेन नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडे दिलीपचा गट अपघात विमा उतरविला होता. या विमा पॉलिसीनुसार रस्ते अपघतात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व विमान अपघातात मृत्यू झाल्यास चार लाख रुपये विमा कंपनीने वारसाला द्यायची होती. नानाविध कारणे सांगून विमा कंपनीने रक्कम देण्यास नकार दिला म्हणून ही फिर्याद दाखल केली गेली होती.
दिलीपने सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु तो मंजूर होण्याआधीच त्याचा खून झाला. त्यानंतर त्याच्या विधवा पत्नीने वारसा प्रमाणपत्र व मालमत्तेतील ह्श्श्यिासाठी उच्च न्यायालयात केलेला दावाही प्रलंबित होता. त्यामुळे दिलीपचे नेमके वारस कोण व विम्याची रक्कम कोणाला देय आहे, याविषयी संदिग्धता हे विमा कंपनीने नकार देण्याचे एक कारण होते. परंतु दिलीपची विधवा पत्नी नोटीस काढूनही ग्राहक न्यायालयात आली नाही. त्याच्या वडिलांनी, दोन भावांनी व दोन बहिणींनी या विम्याच्या रकेमत आम्हाला काही वाटा नको, अशी प्रतिज्ञापत्रे केली. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने दिलीपच्या आईलाच एकमेव वारस मानून विम्याची सर्व रक्कम तिला देण्याचा निकाल दिला. (विशेष प्रतिनिधी)