30 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींच्या ऑडीटचे आदेश निघतात 'ती' इमारत 125 वर्षानंतरही भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 16:29 IST2017-08-10T19:23:17+5:302017-08-12T16:29:12+5:30
मुंबई महापालिकेचे मुख्यालय असलेल्या सीएसटी येथील महापालिकेच्या इमारतीने मागच्याच आठवडयात 125 व्या वर्षात पदार्पण केले.

30 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींच्या ऑडीटचे आदेश निघतात 'ती' इमारत 125 वर्षानंतरही भक्कम
मुंबई, दि. 10 - मुंबई महापालिकेचे मुख्यालय असलेल्या सीएसटी येथील महापालिकेच्या इमारतीने मागच्याच आठवडयात 125 व्या वर्षात पदार्पण केले. इंडो- गॉथिक शैलीमधील ही इमारती आजही सर्वांचे लक्ष वेधून घेते. ही इमारत भक्कम स्थितीत असून, पालिकेला या इमारतीची दुरुस्ती, देखभालीची चिंता करण्याची गरज नाही. आज या 125 वर्षाच्या इमारतीमधून जुन्या इमारतींच्या ऑडीटचे आदेश निघतात. 1884 साली या भव्य इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले. तेव्हाचे व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन यांच्याच हस्ते पायाभरणी करुन ही इमारत बांधायला सुरुवात केली. 9 वर्षे बांधकाम केल्यानंतर 31 जुलै 1893 रोजी इमारत बांधून पूर्ण झाली.
अंदाजापेक्षा प्रत्यक्ष खर्च कमी
या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे इमारतीचा एकूण खर्च 11 लाख 88 हजार 082 रुपये इतका ठरवण्यात आला होता मात्र केवळ 11 लाख 19 हजार 969 रुपयांमध्ये त्याचे काम पूर्ण झाले. म्हणजेच 68 हजार 113 रुपये इतके पैसे वाचवले गेले. आज प्रत्येक कामाचा खर्च त्याच्या अंदाजित रकमेपेक्षा कित्येक पटीने वाढतो, वाढवलाही जातो. मात्र खर्च कमी झाल्याचे असे उदाहरण विरळाच.
खरतर 100 वर्षानंतर इमारत जीर्ण होते, मोडकळीस येते पण पालिकेची ही इमारत अपवाद आहे. महापालिकेच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. मागच्या 30 वर्षात पीडब्ल्यूडीने बांधलेल्या इमारतींची अवस्था खराब आहे. काही इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. लीकेजची समस्या आहे. काही इमारतींचे प्लास्टर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
मागच्याच आठवडयात नरीमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवासात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील सिलिंग कोसळले. ज्यावेळी ही दुर्घटना घटना घडली त्यावेळी सतीश पाटील तिथे नसल्याने बचावले. पीडब्ल्यूडीने बांधलेल्या काही इमारतींची अवस्था अत्यंत खराब असून, त्यांना तात्काळ दुरुस्तीची गरज आहे. महत्वाच म्हणजे या इमारती मागच्या 25 ते 30 वर्षातील आहे. अशाच पाच इमारतींचा घेतलेला आढावा.
मनोरा आमदार निवास
1990 साली मनोरा आमदार निवास प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाले. इथे आमदारांसाठी 336 फ्लॅटस आहेत. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1994 साली या संकुलातील दोन विंगचे उदघाटन केले. त्यानंतर 1995 साली तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी इथल्या दोन विंगचे उदघाटन केले.
2005 सालापासून इथल्या फ्लॅटसमधील प्लास्टर कोसळण्यास सुरुवात झाली. चारवर्षांपूर्वी डी विंग राहण्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले. आता पीडब्ल्यूडीने मनोरा संकुलात गाडया उभ्या करणेही धोकादायक असल्याच्या नोटीसा लावल्या आहेत. तिथल्या इमारतींची अवस्था इतकी खराब आहे की, आमदारांना पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर फ्लॅटस रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. मनोरा आमदार निवास पाडून पूर्नबांधणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अमर महाल उड्डाणपूल
चेंबूर येथील अमर महाल उड्डाणपूल क्वाड्रीकॉन टेक्नोलॉजीने बांधण्यात आला आहे. 1995 साली हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. हा पूल बांधणा-या इंजिनिअर्सनी भविष्यात इथून जाणा-या वाहनांची संख्या वाढेल हा विचारच केला नाही. देखभालीअभावी यावर्षी मे महिन्यात या पूलाचे सांधे निखळले. आयआयटी मुंबईने हा पूल पाडण्याची शिफारस केली आहे.
नवी प्रशासकीय इमारत
चेंबूर येथील रामकृष्ण चेंबूरकर मार्गावरील नवी प्रशासकीय इमारत 1990 च्या सुमारास बांधण्यात आली. आज या इमारतीला तडे गेले असून, प्लास्ट कोसळणे नित्याचेच झाले आहे. या इमारतीत विविध सरकारी विभागांची कार्यालये आहेत. या इमारतींच्या खांबाला तडे गेले आहेत अशी माहिती एका पोलीस अधिका-याने दिली. या इमारतीत झोन-6 च्या पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आहे.
आरोग्य भवन
सीएसटी येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आरोग्य भवन ही इमारत आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर राज्य आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांचे कार्यालय आहे. या संपूर्ण मजल्यावर पाणी गळतीची समस्या आहे. इमारतीला तडे गेले असून काही प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या इमारतीचे उदघाटन केले होते.
बांधकाम भवन
अदी मुर्झबान स्ट्रीटवर ही इमारत असून, बांधकाम भवन पीडब्ल्यूडीचे मुख्यालय आहे. आज तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात ही इमारत बांधण्यात आली. त्यावेळी छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. 2009 मध्ये या इमारतीचे उदघाटन झाले. या इमारतीच्या पॅसेजमधील प्लास्टर कोसळण्यास सुरुवात झाली आहे.