अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम
By Admin | Updated: August 3, 2016 02:02 IST2016-08-03T02:02:32+5:302016-08-03T02:02:32+5:30
प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले
_ns.jpg)
अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम
पुणे : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांनी आॅनलाइन प्रक्रियेत अद्याप सहभागच घेतला नाही,अशाही विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी अजूनही कायम आहे.
राज्याच्या तंत्र शिक्षण विभागातर्फे (डीटीई) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चार फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेश फेरीत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलण्याची संधी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील व चांगल्या महाविद्यालयाची निवड करता आली. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सोमवारपासून प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने पाचवी फेरी घेतली जाणार आहे.
वेळेत आवश्यक कागदपत्र प्राप्त न झाल्याने पूर्ण अर्ज भरता आला नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना
जे विद्यार्थी प्रवेशास पात्र नव्हते,
मात्र आता पात्र झाले आहेत,
अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.
विद्यार्थी येत्या १ ते ५ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतील. त्याचप्रमाणे याच कालावधीत अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर (एआरसी) कागदपत्रांची तपासणी करून अर्ज सबमिट करता येईल.
या विद्यार्थ्यांची स्वतंत्र प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. मात्र, पाचव्या फेरीतून महाविद्यालय स्तरावरील कोट्यातील जागांवर आणि शासकीय महाविद्यालयातील रिक्त जागांवरच प्रवेश दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)