लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुटीवरील जवानांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश मिळाल्याने, देशसेवेला प्राधान्य देणाऱ्या जवानांच्या देशभक्ती, निस्वार्थ सेवा आणि जबाबदारीच्या भावस्पर्शी कथा पुढे येत आहेत. कुठे नवरदेवाचा पोशाख काढून जवानांनी वर्दी चढवून सीमेकडे प्रस्थान केले, तर कुणी मेहंदीने रंगलेल्या हातांनीच बंदूक हाती घेतली. या क्षणी नववधू व नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रूंची धार होती, पण त्यामागचा अभिमानही स्पष्ट जाणवत होता.
गावी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली; स्वप्निलने देशसेवेला प्राधान्य देत बॉर्डर गाठली
उदगीर (जि. लातूर) : भारत-पाक सीमेवर शस्त्रसंधी झाली असली, तरी जवानांना कर्तव्यावर बोलावले जात आहे. त्यामुळे जवान कौटुंबिक सोहळा सोडून कर्तव्यावर निघाले. उदगीर तालुक्यातील नळगीरच्या जवानाचा रविवारी विवाह होता. मात्र, कर्तव्य बजावण्यासाठी संदेश आल्यामुळे विवाहासाठी मिळालेली सुट्टी व विवाह सोहळा रद्द करून तो देशसेवेसाठी हजर झाला आहे. नळगीर येथील स्वप्नील अशोक गायकवाड हा जवान आठ वर्षांपासून श्रीनगरच्या सीमेवर आहे. रविवारी स्वप्नीलचे लग्न जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील सपना प्रशांत तोगरे या मुलीसोबत होणार होते. सोहळ्याची जय्यत तयारी झालेली होती. हा विवाह सोहळ्याला काही तास शिल्लक असतानाच त्याला सीमेवरून कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश आला. त्यामुळे स्वप्नीलने विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन देशासाठी सेवेत रुजू होण्यासाठी बॉर्डर गाठली.
अंगावरची हळद निघण्यापूर्वीच निघाला सीमेवर, नववधूसह नातेवाइकांच्या डोळ्यात दाटलं पाणी
सांगोला (जि. सोलापूर) : सहा दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेला भारतीय सैन्य दलातील जवान योगेश आलदर याच्या अंगावरची हळद निघण्यापूर्वीच सैन्य दलाच्या सर्व सुट्ट्या रद्द झाल्याचा मेसेज आला आणि तो मोहिमेवर कर्तव्यावर रवाना झाला. यावेळी पाणवलेल्या डोळ्यांनी नातेवाइकांनी, तुझं आत्ताच लग्न झाले आहे, अजून अंगावरची हळद निघाली नाही, अशी विनवणी केली असता, योगेशने देशसेवेसाठी जाणे आवश्यक असल्याचे सांगून सर्वांची समजूत काढताच नववधूसह नातेवाइकांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुळचे कोळे (ता. सांगोला) येथील जवान योगेश आलदर यांच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय असल्याने ते सांगली येथे स्थायिक झाले आहेत. २०१९ मध्ये तो सैन्य दलात भरती झाला. योगेश सध्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री रणगाडा चालक म्हणून राजस्थानमधील श्री गंगानगर येथे कर्तव्य बजावत आहे.
साखरपुड्याचा शुभमुहूर्त साधत सेवेचा आदर्श, देशासाठी माजी सैनिक कुटुंबीयांनी दिली मदत
जळगाव : राष्ट्रसेवेचा वारसा हा फक्त गणवेशापुरता मर्यादित न ठेवता, तो जीवनपद्धती म्हणून जपणारे आणि पुढील पिढीकडे सुपूर्द करणारे माजी सैनिक प्रवीण संतोष पाटील (रा.शिवराणा नगर, पिंप्राळा) यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. मुलीच्या साखरपुड्यात भेट स्वरूपात आलेली एक लाख दोन हजारांची रक्कम त्यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत स्वेच्छेने दिली. पाटील यांची कन्या प्रियंका यांचा साखरपुडा रविवारी पार पडला. यात आलेले भेट स्वरूपातील एकूण १ लाख २ हजार रुपये त्यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत स्वेच्छेने दिले. सीमेवर संघर्षाच्या काळात कोणताही विचार न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या सेवेसाठी सामान्य माणसानेही काहीतरी योगदान दिले पाहिजे, या विचारातून पाटील कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.