भारतीय सैन्यदलांनी मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अचूक आणि भेदक अशी कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांना उद्ध्वस्त केले. या बरोबरच गेल्या महिन्यात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करून २६ भारतीय पर्यटकांच्या करण्यात आलेल्या हत्येचा बदला भारताने घेतला. भारतीय सैन्यदलांच्या या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. तर भारतात या कारवाईसाठी भारताच्या सैन्यदलांचं कौतुक केलं जात आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ऑपरेशन सिंधूर ला मिळालेल्या यशानंतर भारताच्या सैन्य दलाचं कौतुक केलं आहे. भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सैन्यदलांचं कौतुक केलं आहे.
प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. आता पाकिस्तानचे भारतातील स्लिपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, असेही या पत्रकात उद्धव ठाकरे म्हणाले.
भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे.भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.