पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून केलेले प्रतिहल्ले परतवून लावत भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांना लक्ष्य केले होते. मात्र आता या कारवाईवरून देशात राजकारणाला तोंड फुटलं असून, महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या पद्धतीवर खोचक टीका केली आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारने पारदर्शकता बाळगून लोकांना योग्य माहिती दिली पाहिजे, असा टोलाही लगावला आहे.
आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये आपलं किती नुकसान झालं आहे, आपली किती जीवितहानी झाली आहे, आपल्या किती सैनिकांचं नुकसान झालं आहे. आपल्या किती राफेलचं नुकसान झालं आहे, याची माहिती मिळाली पाहिजे.
पाकिस्तानने चीनमध्ये तयार झालेले ड्रोन पाठवले. त्या ड्रोनची किंमत १५ हजार रुपये आहे. त्याने काही होत नाही. ते एक ड्रोन पाडण्यासाठी आपण १५ लाखांचे क्षेपणास्त्र डागले. हे ड्रोन पाठवण्यामागे चीनचं खास धोरणं होतं, असं म्हणतात. त्यामागे सत्य काय आहे हे मला माहिती नाही. मात्र असे पाच सहा हजार चायनिज ड्रोन भारताच्या दिशेने पाठवले गेले. त्यांना पाडण्यासाठी आपण १५ लाखांचे क्षेपणास्त्र वापरले. त्याशिवाय आपली तीन की चार राफेल विमानं पाकिस्ताननं पाडली, अशी चर्चा आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, सरकारने या मोहिमेदरम्यान काय निर्णय घेतले. किती खर्च केला आणि त्याचे काय परिणाम झाले, हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. त्यामुळे सरकारने याबाबत स्पष्ट उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.