महापौर बंगल्याचे प्रवेशद्वार सामान्यांसाठी खुले करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 04:39 IST2016-07-31T04:39:14+5:302016-07-31T04:39:14+5:30
महापौर बंगल्याची शोभा वाढवण्यावण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने महापौर बंगल्याच्या शेजारील सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण केले

महापौर बंगल्याचे प्रवेशद्वार सामान्यांसाठी खुले करा!
मुंबई : महापौर बंगल्याची शोभा वाढवण्यावण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने महापौर बंगल्याच्या शेजारील सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण केले. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता महापालिकेने महापौरांसाठी या भूखंडावर उद्यान उभारले.
मात्र उच्च न्यायालयाने महापालिकेला याबाबत चांगलेच फटकारत तातडीने महापौर बंगल्याचे प्रवेशद्वारे उघडे करून हा बगीचा सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे निर्देश महापालिकेला दिले.
नवी मुंबई महापालिकेने महापौरांच्या बंगल्यासाठी सिडकोकडून सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल येथील भूखंड संपादित केला. महापौरांच्या बंगल्याची शोभा वाढावी यासाठी बंगल्याच्या आजुबाजूच्या भूखंडावर खासगी उद्यानही उभारले.
मात्र हे उद्यान सिडकोच्या भूखंडांवर अतिक्रमण करून उभारण्यात आले. महापालिकेने सिडकोकडून कायदेशीररीत्या भूखंड संपादित केला नाही. सार्वजनिक उद्यानाच्या नावाखाली हे उद्यान केवळ महापौरांकरिताच करण्यात आले, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. हिमांशु केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर होती.
‘महापौर बंगल्याच्या प्रवेशद्वारातूनच उद्यानात जाता येते आणि महापौर बंगल्याचे प्रवेशद्वार बंद असते. त्यामुळे सामान्यांना या उद्यानात जाता येत नाही,’ असे संदीप ठाकूर यांनी खंडपीठाला सांगितले.
त्यावर खंडपीठाने महापालिकेला चांगलेच फटकारले. ‘सिडकोच्या भूखंडावर तुम्ही अतिक्रमण कसे करू शकता? सार्वजनिक उद्यानाच्या नावाखाली हे उद्यान केवळ एका व्यक्तीसाठी बांधण्यात आले आहे. त्यामुळे महापौर बंगल्याचे प्रवेशद्वारे खुले करून सामान्यांना या उद्यानात प्रवेश द्या. अन्यथा सिडको त्यांना वाटेल ते करण्यास मोकळी आहे,’ असे म्हणत खंडपीठाने महापालिकेला दोन आठवड्यांत उद्यानासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार सुरू करणार की नाही, याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)
>शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेने हे उद्यान सार्वजनिक असल्याचा दावा केला. मात्र संदीप ठाकूर यांनी याठिकाणी सामान्यांना प्रवेश नसल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणली.
ही सुनावणी न्या. हिमांशु केमकर व कर्णिक यांच्या खंडपीठासमोर होती.