- आमच्या मालमत्तेमध्ये तिसऱ्याच पक्षाचे हक्क निर्माण झाले आहेत. त्यासाठी स्वतंत्र दावा दाखल करावा लागेल का? - राजेश ढोमणे, यवतमाळजेव्हा वाटपाचा दावा करायचा असतो, त्याच्या अगोदरच त्या मालमत्तेमध्ये तिसऱ्याच पक्षाचे हक्क निर्माण झाले असतील, काही करार, व्यवहार, खरेदी-विक्री, हस्तांतरण आदी झालं असेल तर मग काय करायचं, असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. त्यासाठी स्वतंत्र दावा करायचा का, हा प्रश्नही उभा राहतो. तर यासाठी स्वतंत्र दावा दाखल करण्याची अजिबात गरज नाही.
या तृतीय पक्षाविरुद्ध स्वतंत्र दावा दाखल करण्याऐवजी त्या सगळ्यांनाच या वाटपाच्या दाव्यात सामील करून त्याला आव्हान देणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यांना आपल्याला प्रतिवादी करावं लागेल. तसं केल्याशिवाय आपल्याला त्या दाव्यामध्ये त्या विशिष्ट विषयासंबंधात निकाल मिळू शकत नाही, कारण नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार ज्याच्या विरोधात आपल्याला निकाल हवा आहे, तो त्या दाव्यामध्ये पक्षकार असणं, त्याला त्याचं म्हणणं मांडायची संधी मिळणं अत्यंत गरजेचं असतं.
त्यामुळे जेव्हा वाटपासंदर्भात काही वाद असले आणि त्यासाठी न्यायालयात दावा करायचा असेल तर त्याआधी आपल्या मालमत्तेसंदर्भात आपणच संपूर्ण चौकशी करावी. संबंधित मालमत्तेसंदर्भात काही करार झालेले आहेत का. जर करार झालेले आढळून आल्यास त्याच्या सर्टिफाइड कॉपीज काढून घ्याव्यात. यामुळे त्या व्यवहारात कोण कोण सामील आहेत, त्यांचे पत्ते, त्यांचा व्यवहार, त्यांचे अधिकार काय आहेत आणि ते अधिकार आपल्या अधिकारांवर कशाप्रकारे अतिक्रमण आणताहेत, याची माहिती आपल्याला मिळेल. त्यानंतर कोणाकोणाला प्रतिवादी करायचंय याची नीट कल्पना आपल्याला येईल.