सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी शक्य - मुख्यमंत्री
By Admin | Updated: August 4, 2014 03:16 IST2014-08-04T03:16:52+5:302014-08-04T03:16:52+5:30
काँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत.

सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी शक्य - मुख्यमंत्री
नाशिक : काँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. युती सरकारच्या कारभारानंतर जनतेने लोकशाही आघाडीवर विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. आता सहाव्यांदा आघाडीचा प्रस्ताव आला तर सन्मानजनक तडजोडीसाठी कॉँग्रेस तयार आहे; परंतु कोणत्याही अटी-शर्ती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात बोलताना केले. काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करीत स्वबळाचा नारा दिला.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने पराभवाचे विश्लेषण-चिंतन केले. आता विभागीय मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकले आहे. नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे, असे चव्हाण म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावर हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालविला जाणार असल्याची भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. गुजरात मॉडेलच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत अपप्रचारामुळे पक्षाला पराभव पाहावा लागला; परंतु आता वातावरण बदलते आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. आम्ही एकही जागा सोडणार नाही. सन्मानजनक तडजोडीस तयार आहोत; अन्यथा २८८ जागा लढविण्याची तयारी आहे. काँग्रेसची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर होणार असून, ११ आॅगस्टपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)