विधानसभेसाठीही आघाडीची एकीच
By Admin | Updated: July 4, 2014 04:32 IST2014-07-04T04:32:54+5:302014-07-04T04:32:54+5:30
विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत; मात्र आम्हाला अधिक जागा हव्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेसाठीही आघाडीची एकीच
मुंबई : विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत; मात्र आम्हाला अधिक जागा हव्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
जागावाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच
होऊन प्रसंगी १५ वर्षांपासूनची आघाडी या निवडणुकीत संपुष्टात येईल, असा अंदाज राजकीय जाणकर बांधत
होते. पण काही झाले तरी दोन्ही काँग्रेस एकत्रच लढणार, असे तटकरे यांनीच स्पष्ट केल्याने ‘वेगळे’ लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. जागा वाटपासंदर्भात काँग्रेस पक्षासोबत समन्वयातून चर्चा केली जाईल, असे सांगून तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला काँग्रेसपेक्षा दोन जागा अधिक मिळाल्या आहेत. शिवाय, राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे या वेळी आम्ही अधिक जागांची मागणी केली आहे. राज्यात चौथ्यांदा विजय साकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचेही तटकरे यांनी सांगितले. निर्धार मेळाव्याची सुरुवात पालघर येथून झाली आहे. पुढील मेळावा शुक्रवार दि. ४ जुलै रोजी अहमदनगर येथे, शनिवारी ५ जुलै रोजी कल्याण-डोंबिवली तर रविवार ६ जुलै रोजी जळगाव येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.