मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता नवी टोपी, कॉन्स्टेबल, अंमलदारांना वापरता येणार केवळ आॅनड्युटीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 20:25 IST2017-09-24T20:24:57+5:302017-09-24T20:25:23+5:30
दीड कोटीवर मुंबईकरांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ४० हजारांवर मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता जुन्या पारंपरिक टोपी ऐवजी आकर्षक ‘कॅप’ पाहावयास मिळणार आहे.

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता नवी टोपी, कॉन्स्टेबल, अंमलदारांना वापरता येणार केवळ आॅनड्युटीच
मुंबई, दि. 24 - दीड कोटीवर मुंबईकरांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ४० हजारांवर मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता जुन्या पारंपरिक टोपी ऐवजी आकर्षक ‘कॅप’ पाहावयास मिळणार आहे. नायगाव अन्य मुख्यालयातील पोलीस कँटीनमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कॉन्स्टेबल ते सहाय्यक फौजदारापर्यंतच्या अंमलदारांसाठी ही नवी टोपी केवळ पूर्ण गणवेश व ड्युटीवर कार्यरत असताना वापरता येणार आहे.
ऊन, पावसाची पर्वा न करता विविध गुुन्ह्यांचा तपास व बंदोबस्तामध्ये व्यस्त असणा-या पोलिसांना डोक्यावर बचावाबरोबरच आकर्षक व सहजतेने वापरता यावी, यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही नवी कॅपची कल्पना अंमलात आणली आहे. सध्या पोलीस कॅन्टीन तसेच नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलाच्या (एलए) कॅन्टीनमध्ये उपलब्ध आहेत. सध्या प्रत्येक पोलिसाला केवळ एकच कॅप खरेदी करता येणार असून, दुस-या टप्प्यात आणखी नव्या टोपी मागविण्यात आल्यानंतर त्यांना आणखी एक घेता येणार आहे.
नव्या कॅपसाठी ७२.९२ रुपये मोजावे लागणार असून, त्यांना दोनपेक्षा अधिक टोपी खरेदी न करण्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. अॅक्सिस बॅँकेचे एटीएम स्वॅप करून खरेदी करता येणार आहे. पोलीस खासगी ड्रेस किंवा अर्धवट गणवेशात असल्यास त्यांना ही टोपी डोक्यावर घालता येणार नाही. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कॅप वितरणाची जबाबदारी मुख्यालयातील निरीक्षक (पोलीस कल्याण ) यांच्यावर असणार असून प्रत्येक पोलीस ठाणे व शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकांनी आपल्या अखत्यारितील प्रत्येक कॉन्स्टेबलला त्याच्या वापराबाबत सूचना करावयाच्या आहेत.