तीन महिन्यांत फक्त आरोग्य विम्याचीच चलती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:12 AM2020-07-28T06:12:17+5:302020-07-28T06:12:32+5:30

तीन महिन्यांत प्रीमियम एक हजार कोटींनी वाढला : विम्याच्या अन्य प्रकारांमध्ये मात्र घट

Only health insurance in boom in three months | तीन महिन्यांत फक्त आरोग्य विम्याचीच चलती

तीन महिन्यांत फक्त आरोग्य विम्याचीच चलती

Next

संदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे संकट आल्यानंतर विमा क्षेत्रात केवळ आरोग्य विमा पॉलिसी काढण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत आरोग्य विम्याच्या प्रीमियमची रक्कम तब्बल एक हजार कोटींनी वाढली असून अन्य १५ प्रकारच्या पॉलिसींच्या प्रीमियमच्या रकमेत २ हजार ६४२ कोटींची घट नोंदविण्यात आली आहे.


कोरोनासोबत जगायला शिकताना या आजारावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणारा भरमसाट खर्च धडकी भरविणारा ठरत आहे. त्यामुळे आरोग्य विमा काढण्याकडे कल वाढला आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (आयआरडीएआय) आदेशानुसार विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि रक्षक या दोन विशेष पॉलिसीही उपलब्ध करून दिल्या आहेत. आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण ७.९८ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास येते.


२०१९ साली आरोग्य विम्याच्या प्रीमियमपोटी विमा कंपन्यांना १२,४४३ कोटी रुपये प्राप्त झाले होते. यंदा ती रक्कम १३,४३६ कोटींवर गेली. केवळ आरोग्य विमा विकणाऱ्या खासगी कंपन्यांनी सर्वाधिक १८.६९ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यांच्या प्रीमियमचे आकडे २,६५३ कोटींवरून ३,१३९ कोटींवर गेले. तर, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असलेल्या नॅशनल, न्यू इंडिया, ओरिएण्टल, युनायटेड या पाच कंपन्यांकडे सर्वाधिक विमाधारक असून त्यांचा प्रीमियम ६८८६ कोटींवर पोहोचला आहे. २१ जनरल इन्शुरन्स कंपन्याही आरोग्य विमा उपलब्ध करून देतात. त्यांच्या प्रीमियमची रक्कम मात्र ३६९८ कोटींवरून ३४०० कोटी कमी झाली. आरोग्य विमा विकणाºया कंपन्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे यातून लक्षात येते.


अन्य प्रकारच्या विम्यात ४.२४ टक्के घट
विमा कंपन्या शेतापासून ते वैयक्तिक दुर्घटनांपर्यंत आणि आगीपासून ते क्रेडिट गॅरंटीपर्यंत जवळपास १५ प्रकारांमध्ये विम्याचे संरक्षण देतात. या सर्व क्षेत्रांतील विम्याच्या प्रीमियमपोटी मागील तीन महिन्यांत ३९,३२९ कोटी जमा झाले. गेल्या वर्षी ती रक्कम ४१,०७१ कोटी होती. आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ होताना दिसत असली तरी एकूण रक्कम मात्र ४.२४ टक्क्यांनी कमी झाली आहे.

आरोग्य विम्याची उलाढाल वाढणार
गेल्या तीन महिन्यांत विमा कंपन्यांकडे जमा झालेला प्रीमियम तब्बल १३ हजार ४३६ कोटींचा आहे. फक्त कोरोना रुग्णांच्या आरोग्य विम्यापोटी या कालावधीत एक हजार कोटींचा परतावा कंपन्यांनी दिला असून अन्य आजारांवर उपचार घेणाºया रुग्णांनी क्लेम केलेल्या रकमेचा आकडा तूर्त उपलब्ध नाही. येत्या काही दिवसांत कोरोनाचे मेडिक्लेम वाढणार असले तरी कोरोनाच्या विशेष पॉलिसी घेण्याचे प्रमाणही वाढल्याने कंपन्यांची आवक वाढेल, अशी माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली.

Web Title: Only health insurance in boom in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.