एटीएममधून आता फक्त पाचच व्यवहार मोफत
By Admin | Updated: August 15, 2014 03:05 IST2014-08-15T03:05:54+5:302014-08-15T03:05:54+5:30
बँक खातेदारांना यापुढे आपल्याच बँकेच्या एटीएमवरून महिन्यातून फक्त पाच वेळा पैसे काढण्याचे व्यवहार नि:शुल्क करता येणार आहेत

एटीएममधून आता फक्त पाचच व्यवहार मोफत
मुंबई : बँक खातेदारांना यापुढे आपल्याच बँकेच्या एटीएमवरून महिन्यातून फक्त पाच वेळा पैसे काढण्याचे व्यवहार नि:शुल्क करता येणार आहेत. त्यापुढील प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी ग्राहकास २० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यास रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना मुभा दिली आहे. सध्या खातेदार स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून कितीही वेळा पैसे काढण्याचे व्यवहार नि:शुल्क करू शकत होते.
एटीएमवरील व्यवहार आणि त्यासाठीची शुल्क आकारणी याविषयी बँकांना सुधारित निर्देश देणारे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केले. त्यानुसार खातेदारांना इतर बँकांच्या एटीएमवरून दरमहा करता येणाऱ्या नि:शुल्क व्यवहारांची संख्याही सध्याच्या पाचवरून तीन करण्यात येणार आहे. नि:शुल्क व्यवहारांच्या संख्येत होणारी ही कपात फक्त मुंबईसह देशातील सहा महानगरांमधील एटीएमनाच लागू होईल. (विशेष प्रतिनिधी)