शहरात सीएनजीवरील वाहने फक्त ६८ हजार..!
By Admin | Updated: August 1, 2016 01:14 IST2016-08-01T01:14:28+5:302016-08-01T01:14:28+5:30
सीएनजी वाहनांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असताना शहरात सध्या सीएनजीवर चालणारी केवळ ६८ हजार वाहने असल्याचे स्पष्ट झाले

शहरात सीएनजीवरील वाहने फक्त ६८ हजार..!
पुणे : शहरातील हवेचा दर्जा सुधारावा यासाठी सीएनजी वाहनांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असताना शहरात सध्या सीएनजीवर चालणारी केवळ ६८ हजार वाहने असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी शहरातील एकूण वाहनांची संख्या ३१ लाखांवर पोहोचली असून, त्यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे दुचाकी वाहनांनी २३ लाखांचा टप्पा पार केला आहे.
महापालिकेच्या वतीने शुक्रवारी २०१५-१६ चा पर्यावरण अहवाल प्रकाशित करण्यात आला. शहरातील हवा, पाणी, मृदा यांचे होणारे प्रदूषण, त्याचा मानवी जीवनावर आणि शहरांवर होणारा परिणाम, त्याची कारणे व ते रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल प्रकाशित केला जातो. शहराचा वेगाने विकास होत असताना पर्यावरणाची
कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष वेधण्याचे काम अहवालाद्वारे केले जाते.
शहरातील हवेचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जगभर सीएनजी वाहनांवर भर दिला जात आहे. दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाची पातळी खालावल्याने तिथे अनेक ठिकाणी सीएनजी वाहने बंधनकारक करण्यात आली आहेत. पेट्रोल, डिझेल आदी इंधनावरील वाहनांच्या धुरामधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनाक्साइड बाहेर पडते, त्यामुळे हवेची पातळी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. ते रोखण्यासाठी सीएनजी वाहनांचा पाठपुरावा केला जात आहे. पेट्रोल, डिझेलवरील रिक्षांनी सीएनजी किट बसवून घ्यावे यासाठी महापालिकेच्या वतीने १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, शहरातील ३० लाख वाहनांपैकी केवळ ६८ हजार ७८४ वाहने सीएनजीवर चालत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामध्ये तीनचाकी ३० हजार ६७०, चार चाकी ३६ हजार ८८८, पीएमपीच्या १ हजार २२६ वाहनांचा समावेश आहे. शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ही संख्या खूपच तोकडी आहे.
(प्रतिनिधी)
।शहरामध्ये मागील वर्षी दुचाकींची संख्या २१ लाख ५२ हजार इतकी नोंदविण्यात आली होती, त्यामध्ये दोन लाखांची वाढ होऊन ती २३ लाख ३१ हजार इतकी झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने दिवसेंदिवस दुचाकींची वाढत असलेली संख्या शहराच्या वाहतूक व्यवस्था व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
स्वत:ची कार खरेदी करणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत असून, कार, जीपची संख्या एक लाखांच्या घरात पोहोचली आहे. मागील वर्षी २८ लाख ७० हजार वाहनांची संख्या नोंदविण्यात आली होती. त्यामध्ये वाढ होऊन एकूण वाहनांची संख्या ३१ लाख ७ हजार ९६२ झाली आहे.