Onion Price : कांदा आणखी रडवणार; यंदा शंभरी पार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 04:08 AM2019-11-22T04:08:01+5:302019-11-22T06:32:45+5:30

Onion Price : घाऊक बाजारात विक्रमी दर; जानेवारीअखेरपर्यंत राहणार महागच

onion price may hike this year | Onion Price : कांदा आणखी रडवणार; यंदा शंभरी पार करणार

Onion Price : कांदा आणखी रडवणार; यंदा शंभरी पार करणार

Next

- योगेश बिडवई

मुंबई : जोरदार पाऊस व त्यानंतर अवकाळीच्या तडाख्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने लाल कांद्याची अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत कांदा महागच राहण्याची चिन्हे आहेत. घाऊक बाजारात कांदा क्विंटलला विक्रमी साडेसात ते आठ हजार रुपयांवर गेल्याने किरकोळ बाजारात कांदा शंभर रुपयांच्या वर जाण्याची भीती आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये रोज साधारण साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक होते. डिसेंबरमध्ये ती विक्रमी असते. सध्या रोज सरासरी पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. उन्हाळ कांद्याची आवक टिकून असल्याने भाव थोडे नियंत्रणात आहेत. मात्र मेमध्ये शेतकऱ्यांनी साठविलेला उन्हाळ कांदा आता चाळींमध्ये खराब झाला असून तो संपतही आला आहे. नवा कांदा बाजारात येण्यास उशीर होत आहे.

पावसाच्या माºयामुळे खरिपाच्या पूर्वार्धातील कांदा पूर्णत: तर उत्तरार्धात पीक अंशत: खराब झाले. परिणामी यंदा कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याच्या निर्णयाचाही अपेक्षित फायदा होणार नाही.

पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी ८ नोव्हेंबरनंतर बी पेरले. रोपांची वाढ होण्यास दीड महिना आणि त्यानंतर तीन महिन्यांनी कांदा बाजारात येईल, असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सोलापूरला ८ हजार रुपये क्विंटल
सोलापूर बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला सर्वाधिक ८ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सर्वाधिक सात हजार तसेच सरासरी ६४५१ आणि लाल कांद्याला सर्वाधिक ५९६१ तर सरासरी ५५00 रुपये दर मिळाला. नगरच्या बाजार समितीत सर्वाधिक ७६00 रुपये दर मिळाला.

Web Title: onion price may hike this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा