एक होता भारतीय ' स्पायडर मॅन'
By Admin | Updated: July 14, 2016 12:24 IST2016-07-14T12:06:25+5:302016-07-14T12:24:28+5:30
मेळघाटसह मध्यप्रदेशातील पचमढीचा सातपुडा व्याघ्र प्रकल्प व अनेक लहान मोठ्या जंगलतुकड्यांमध्ये भटकून कोळ्यांच्या जीवनशैलीचा एक तप अभ्यास करणारे प्रख्यात प्राणी शास्त्रज्ञ डॉ. गणेश वानखेडेंचे निधन झाले.

एक होता भारतीय ' स्पायडर मॅन'
>किशोर रिठे
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. १४ - मध्य भारतातील सातपुडा पर्वत म्हटले की इथल्या वाघांची व व्याघ्र प्रकल्पांची चर्चा होते. परंतु सातपुडा पर्वतरांगेतील या व्याघ्र प्रकल्पांनी वाघांशिवाय रानपिंगळा, पिसोरी (माऊस डिअर), कॅरॅकल, चांदी अस्वल, महासीर मासा व कोळ्यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचेही संवर्धन केले आहे. या वन्यजीवांच्या प्रजातींवर काही वेडे लोक काम करतात व त्यानंतर या वन्यजीवांची तसेच त्यांना पोसणाऱ्या या जंगलांच्या नवखेपणाची जगाला ओळख होते.
सातपुडा पर्वत पर्वतरांगेतील महाराष्ट्राच्या मेळघाट सह मध्यप्रदेशातील पचमढीचा सातपुडा व्याघ्र प्रकल्प व या पर्वतरांगेतील अनेक लहान मोठ्या जंगलतुकड्यांमध्ये भटकून कोळ्यांच्या जीवनशैलीचा तब्बल १२ वर्षे अभ्यास करणारे प्रख्यात प्राणी शास्त्रज्ञ डॉ. गणेश वानखेडे यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या संशोधनाने संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व सामान्य निसर्गप्रेमींना वेड लावून इथल्या जंगलांमध्ये खेचून आणणारं उत्तुंग व्यक्तिमत्व संशोधन कार्याच्या अत्युच्य शिखरावर असतांना लोप पावलं याचीच आज सर्वांना खंत आहे. "रक्ताच्या कँसर" वर नागपूर येथे उपचार सुरळीत सुरू असतानाच त्यांचे "ब्रेन हॅमरेज" ने निधन व्हावे हे समजण्यासारखे नाही.
मनुष्य जीवनभर विद्यार्थी असतो असे म्हणतात. पण भारतातील विद्यापीठांमधील विद्यार्थी व त्यांचे अध्यापक यांचेही काही "शिक्षक" असतात.डॉ.गणेश वानखेडे अश्या "शिक्षकांचे शिक्षक" होते. त्यांच्या जाण्यामुळे त्यांचे राज्यभर पसरलेले शेकडो विद्यार्थी,बाहेरच्या राज्यांमध्ये व देशात असल्याने त्यांचे अंत्यदर्शन घेऊ न शकणारे असंख्य अध्यापक व प्राणी शास्त्रज्ञ "फेसबुक" वर हुंदके देतांना पाहून या माणसाची उंची कळते. त्यांनी अमरावती विद्यापीठासह अनेक संघटनांसोबत काम केले असले तरी त्यांचा संपूर्ण जगभर गोतावळा पहिला की ते स्वतःच एक "संघटना" होते याची जाणीव होते. अनेक विद्यापीठांमध्ये, शिक्षणाचा दर्जा खालावला, शिक्षकांची मूल्ये व त्यांच्या ज्ञानाची पातळी खालावल्याचे आरोप होत असतांना डॉ.गणेश वानखेडे यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासारख्या ठिकाणी राहून "आदर्श संशोधक शिक्षक" कसा असावा हे संपूर्ण देशाला दाखविले. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये त्यांचे नाव सांगितले तरी त्यांच्या विद्यार्थ्याला नोकरी मिळेल असा हा थोर शिक्षक होता!
कोळी म्हणजे जळी, स्थळी, पाषाणी सापडणारा प्राणी. अगदी समुद्र किनाऱ्या पासून तर पर्वताच्या शिखरावरही कोळी आढळून येतात. १९७३ साली "स्काय लॅब" नावाची प्रयोगशाळा अवकाशात उपग्रहाच्या साहाय्याने नेण्यात आली होती. त्यामध्येही कोळी अवकाशात जाळे बनवू शकतो का हे पाहण्यासाठी दोन कोळी सोडले होते. अश्या जागोजागी आढळणाऱ्या कोळ्यांशी शहरातील मनुष्यप्राण्याचा संबंध "जाळे -जळमटे " असाच राहिला आहे. परंतू कोळ्यांचे रहस्यमय जीवन उलगडण्याचे काम डॉ. गणेश वानखेडे यांनी केले. त्यांनी मेळघाट च्या जंगलासह संपूर्ण सातपुडा पर्वतरांगेत कोळ्यांवर संशोधन केले. या संशोधनातील निष्कर्ष चक्रावून टाकणारे आहे. डिसेंबर २००७ पर्यंत मेळघाट मध्ये त्यांनी केलेल्या संशोधनानुसार २०४ प्रजातींच्या कोळ्यांची नोंद करण्यात आली. यापैकी ४३ प्रजाती या भारतात पहिल्यांदाच नोंदविण्यात आल्या. यापैकी काही प्रजाती या सहा नवीन वंशामधील असल्याचे(जनरा) आढळून आले.
२०१६ पर्यंतची आकडेवारी तर त्यांच्या संशोधन कार्याचा धडाका सांगते.
वास्तविक कोळी हा निसर्गाचे संतुलन राखण्यात प्रमुख भूमिका बजावणारा प्राणी आहे. कोळी निसर्गातील कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. शेतातील कीटकांचा तसेच मानवी वस्तीमधील संसर्गजन्य रोगवाहक डासांचा शत्रू अशी कोळ्याची ख्याती आहे. कोळ्यांना संपविण्याचे काम पक्षी, पाली व सरडे यांचे आहे. किंबहुना या प्राण्यांचे कोळी हे मुख्य खाद्य आहे. निसर्ग संरक्षणाचे काम ते चोखपणे बजावत असतांनाही मानवाने कीटकनाशकांच्या माध्यमातून किंवा तिरस्कारातून कोळ्यांवर नेहमी आघात करणे सुरूच ठेवले आहे. नेमके याच त्रुटींवर बोट ठेवून कोळ्यांचे निसर्गचक्रातअसलेले नेमके स्थान, त्यांच्या जीवनक्रमात मानवाने निर्माण केलेले धोके, त्यांचे संवर्धन, प्रजनन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने समाजजाग्रण करण्यासाठी व्याख्याने देणे, संमेलन, परिषदा आयोजन करणे, डायरी, पोस्टर,पुस्तके, संशोधन पेपर व विशेषांक काढणे आदी काम त्यांनी मागील १२ वर्षांमध्ये केले. मेळघाटात कोळ्यांचे रात्रीचेही जीवन असल्याने जंगलात रात्र-रात्र फिरूनही त्यांनी मेळघाटच्या कोळ्यांबद्दल माहिती जमविली.
कोळ्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या नव्या प्रजातींचा शोध लावण्याचे काम तर झालेच पण सोबतच त्यांचे वंशज,त्यांच्यातील विषाची क्षमता, त्यांचे अन्नसेवन,पचनसंख्या, उत्सर्जन, त्यांचे आकार , रंग, जीवनक्रम, आयुष्यमान, प्रजनन क्षमता यावरही या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला. मेळघाटच्या तर विविध अंगांवर कोळ्यांचे संबंध त्यातून तपासल्या गेले.
संत्रा व कापूस ही विदर्भातील मुख्य पिके. पण त्यावरील किडीच्या प्रादुर्भावाने इथला शेतकरी त्रस्त असतो. मग तो कीटकनाशकांचा वापर करतो. यामध्ये शेतकरी आर्थिकदृष्ट्या तुटून जातो. नेमकी ही समस्या लक्षात घेऊन या दोन पिकांवर येणारी कीड व तिचा नाश करण्यात कोळ्यांची भूमिका यावर संशोधनाचा मोर्चा वळविला. ते मुळचे जळगाव जिल्ह्यातील रावेरचे. त्यामुळे जळगावच्या केळीच्या बागांमध्ये असलेला कोळ्यांचा सहभाग यावरही त्यांनी संशोधन केले.
कोळ्यांचे जाळे अगदी कुण्याही स्थापत्य अभियंत्याला लाजविणारी ! ही अत्यंत कलाकुसरीने,वेग- वेगळ्या आकारात विणलेली असतात. एवढेच नाही तर त्यामध्ये असणाऱ्या लवचिकतेमुळे त्यांचा वापर बुलेट प्रूफ जॅकेट (चिलखत) बनविण्यासाठी तसेच शस्त्रक्रिया करतांना वापरण्यात येणारे धागे बनविण्यासाठी सुद्धा करण्यात येतो यावर त्यांचे संशोधन सुरू होते.
डॉ. गणेश वानखेडे यांच्या ३४ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी २६ वर्षे संशोधन कार्यात घालविले. त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या चार भिंतीबाहेर आणून जंगलाच्या प्रयोगशाळेत सोडले. त्यांनी स्वतः जवळपास सहा संशोधन प्रकल्प पूर्ण केले. सोबतच त्यांच्या मार्गदर्शनात जवळपास १८ विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. या सर्व विद्यार्त्यांचे विषयही जंगलातील वन्यजीवांशी संबंधितच होते. सातपुड्यातील नद्या, त्यातील मासे, मेळघाटमधील वाघ व त्यांचे खाद्य, वाघाच्या विष्ठेचे पृथक्करण,कोळी, फुलपाखरे, फुलपाखरांच्या रंगांचे कोडे असे विविध विषय त्यांनी या विद्यार्थ्यांमार्फत हाताळले. रात्रंदीवस चालणारे डिपार्टमेंट म्हणून त्यांचा प्राणिशास्त्र विभाग प्रसिध्द होता. केवळ तीन अध्यापकांच्या या विभागात राज्यातील विविध महाविद्यालयांमधील अध्यापकांचा व विद्यार्त्यांचा सतत राबता राहायचा. कधी कधी ते स्वतःच विभागाची स्वच्छता करायचे. त्यामुळे पुढे पुढे विद्यार्थीच विभागाची साफ सफाई करायला लागले.
डॉ. गणेश वानखेडे यांनी आपल्या अगाध ज्ञानातून १३ पुस्तके लिहिलीत तर ३२ संशोधन पर निबंध लिहिलेत. त्यातील ७ शोधनिबंध हे आंतरराष्ट्रीय तर २६ शोधनिबंध हे राष्ट्रीय जर्नल्स मधून प्रसिध्द झाले. ते २०१५ मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. विद्यापीठात काम करतांना त्यांना कुलगुरू/प्र -कुलगुरू होण्याचीही संधी आली. पण ती नम्रपणे नाकारून त्यांनी आयुष्यभर "संशोधक शिक्षक" राहणेच पसंत केले. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचे संशोधन कार्य व ज्ञान प्रसाराचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवले. नुकतेच नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी कोळ्यांवर ३री आशिया परिषद भारतात अमरावती येथे भरविली. त्यामध्ये जवळपास १७ देशांमधील ४० विदेशी संशोधक व भारतातील विविध संस्थांमधून आलेले ५० संशोधक सहभागी झाले होते.
हे करीत असतांनाच त्यांनी महाराष्ट्र शासनाचा वन्यजीव विभाग, वन विभाग, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, केंद्रीय वन्यजीव मंडळ, केंद्रीय व्याघ्र प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य सेवा आयोग या सर्वांना मदत करणे सुरू ठेवले . सध्या त्यांचे भारतीय कोळ्यांवर लिखाण सुरू होते. अशातही त्यांचा एक पाय हा मेळघाटच्या जंगलातील प्रयोगशाळेत असायचा. निसर्ग संरक्षण संस्थेने मेळघाटमध्ये एक "मुठवा" संशोधन व समुदाय केंद्राची स्थापना केली आहे. या ठिकाणी वर्षभर वन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, प्राणिशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांची निसर्ग अभ्यास शिबिरे, महाराष्ट्र जैव विविधता मंडळाचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असतात. त्याद्वारे ते सातपुड्यातील कोळी विश्व तसेच सातपुड्यातील नद्या, त्यातील मासे व प्राणिशास्त्र याबाबत उदबोधन करायचे. त्यांच्या अश्या अवेळी जाण्याने भारतातील कोळी संशोधनाचे तसेच सातपुड्यातील वन्यजीव संवर्धन चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे.
डॉ. गणेश वानखेडे हे देशातील विविध संघटनांशी संबंध ठेऊन होते. मध्यभारतातील अग्रगण्य सातपुडा फाउंडेशन, अमरावतीची निसर्ग संरक्षण संस्था, मुंबईची बी. एन. एच. एस., इंडिअन सायन्स काँग्रेस, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, अशियन सोसायटी ऑफ अरॅक्नॉलॉजि व इतर अनेक संघटनांशी संबंधित होते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नेचर कन्झर्व्हेटर्स ची २००२ साली फेलोशिप मिळाली तर झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने २००३ साली त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविले. नुकतेच २०१४मध्ये त्यांना सँक्चुरी एशियाचा मुंबई येथे मानाचा "ग्रीन टीचर" राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या विषयातील संशोधन व अध्यापन कार्याच्या अत्युच्य शिखरावर असतांना, वयाच्या फक्त ६५ व्या वर्षी डॉ. गणेश वानखेडे हजारो विद्यार्थ्यांना अनाथ करून गेलेत. त्यांच्या जाण्याने भारतीय कोळी जगताने खरा "स्पायडर मॅन" हरविला. सातपुड्यातील त्यांच्या लाडक्या वन्यजीवांच्या वतीने सरांना विनम्र श्रद्धांजली!
लेखक सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ व महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाचे सदस्य आहेत.