एक लाख शेतकऱ्यांनी काढले ८२३.४२ कोटींचे पीककर्ज !
By Admin | Updated: July 31, 2016 20:08 IST2016-07-31T20:08:54+5:302016-07-31T20:08:54+5:30
सन २०१६ मध्ये जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल ८२३.४२ कोटींचे पीककर्ज काढले आहे

एक लाख शेतकऱ्यांनी काढले ८२३.४२ कोटींचे पीककर्ज !
संतोष वानखडे
वाशिम, दि. ३१ - सन २०१६ मध्ये जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल ८२३.४२ कोटींचे पीककर्ज काढले आहे. खरिप हंगामात पीककर्जाचे वितरण करण्यात कोणत्याही बँकांनी दिरंगाई करू नये, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या निर्देशांच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी वारंवार आढावा बैठका घेतल्या तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिरंगाई करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला होता.
या पृष्ठभूमीवर २९ जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ४७२ शेतकऱ्यांना ८२३ कोटी ४२ लाख रुपये पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. यामध्ये ६ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच पीक कर्ज घेतले आहे.
अमरावती विभागात वाशिम जिल्हा पीककर्ज वितरणात आघाडीवर असून, ८७ टक्क्याच्या वर वितरण झाले आहे. पीक कर्ज वितरणात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६१ हजार ६४२ शेतकऱ्यांना ३६८ कोटी ५२ लाख रुपये पीक कर्ज दिले आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी ३० हजार ६६ शेतकऱ्यांना ३०५ कोटी ४ लाख, खासगी बँकांनी १ हजार ५३३ शेतकऱ्यांना २५ कोटी ११ लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १० हजार ८४२ शेतकऱ्यांना १११ कोटी ५४ लाख रुपये पीक कर्ज स्वरुपात वितरीत केले आहेत.