भामरागड तालुक्यात नक्षलवाद्याकडून एका इसमाची हत्या

By Admin | Updated: June 22, 2016 18:31 IST2016-06-22T18:31:21+5:302016-06-22T18:31:21+5:30

भामरागड तालुक्यात टेकला गावात बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एका इसमाची गळा कापून हत्या केल्याची घटना घडली.

One killed by Naxalites in Bhamragarh taluka | भामरागड तालुक्यात नक्षलवाद्याकडून एका इसमाची हत्या

भामरागड तालुक्यात नक्षलवाद्याकडून एका इसमाची हत्या

ऑनलाइन लोकमत

भामरागड (गडचिरोली), दि. 22 - अहेरी तालुक्यात रविवारी तीन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्नान घातल्यानंतर नक्षलवाद्यांनी आपली दहशत कायम असल्याचे दाखविण्यासाठी भामरागड तालुक्यात टेकला गावात बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एका इसमाची गळा कापून हत्या केल्याची घटना घडली. रामजी दसरू मट्टामी (३५) असे मृत इसमाचे नाव आहे.
एक ते दीड महिन्यापूर्वी भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राचे पोलीस शिपाई बंडू वाचामी यांचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी त्यांची क्रूरपणे हत्या केली होती व त्यांचा मृतदेह आरेवाडा गावाजवळ आणून टाकला होता. यात बंडू वाचामी यांच्या बहिणीचे पती असलेल्या रामजी दसरू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.

पेरमिली दलमचे नक्षलवादी बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास टेकडा गावात दाखल झाले. गावाच्या बाहेर असलेल्या रामजी मट्टामी यांचे घर त्यांनी गाठले व त्यांना झोपेतून उठवून गावाबाहेर आणले व त्यांची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह गावाबाहेर टाकून देण्यात आला. त्यांच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी काही पत्रकेही टाकली, अशी माहिती मिळाली आहे.
भामरागड पोलिसांनी त्यांचा मृतदेह व घटनास्थळावरची पत्रके ताब्यात घेतली असून या घटनेनंतर या परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. मृतक रामजी मट्टामी यांच्या पश्चात दोन पत्नी व तीन मुले आहेत.

Web Title: One killed by Naxalites in Bhamragarh taluka