मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसीसाठी एकच सीईटी
By Admin | Updated: August 30, 2015 01:26 IST2015-08-30T01:26:17+5:302015-08-30T01:26:17+5:30
बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित राज्य पातळीवर एकाच सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (एमएचटी- सीईटी) राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे

मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसीसाठी एकच सीईटी
पुणे : बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित राज्य पातळीवर एकाच सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (एमएचटी- सीईटी) राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करण्याची गरज भासणार नाही.
राज्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी व मेडिकल या तीनही पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई, मेडिकल सीईटी, फार्मसी सीईटी या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत होत्या. त्यामुळे राज्य शासनाने या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचा अध्यादेश काढला आहे.
तीनही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन विषयांची प्रत्येकी ५० गुणांची प्रश्नपत्रिका असेल. तसेच गणित व जीवशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी १०० गुणांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. राज्य परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर ही परीक्षा घेतली जाईल.
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याने राज्य परीक्षा मंडळ किंवा समकक्ष मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित हे विषय अनिवार्य आणि रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ जैवतंत्रज्ञान / टेक्निकल व्होकेशनल या पैकी एका विषयात एकूण ५० टक्के गुण मिळवलेले असावे. मागासर्वगीय व शारीरिक विकलांग विद्यार्थ्याने किमान ४५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत, असे अध्यादेशात म्हटले आहे.
एमएचडी-सीईटीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातील. सीईटीच्या गुणांच्या आधारे अभियांत्रिकी,औषधनिर्माण व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्वतंत्र गुणवत्ता याद्या तयार केल्या जातील. त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची गुणवत्ता यादी सीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांच्या गुणांवर तयार केली जाईल. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित/ जीवशास्त्र या तीन विषयांच्या गुणांवर तयार होईल. वैद्यकीय अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या तीन विषयांवर तयार केली जाईल.