लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायूवेग पथकांनी केलेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिसेस (ओला) कंपनीच्या शोरूम तपासणीमध्ये ४३२ शोरूमपैकी केवळ ४७ शोरूमकडे विक्री परवाना असल्याचे आढळले. त्यामुळे ओलाचे उर्वरित ३८५ शोरूम बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
परिवहन विभागाच्या नियमानुसार, विना नोंदणी वाहने शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवण्यासाठी ट्रेड सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे. मात्र, ओला शोरूमकडे हे प्रमाणपत्र नसल्याने राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने त्यांच्याविरोधात कारवाई केली. परिवहन आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त विजय तिराणकर यांनी याबाबत सरकारला कारवाईची माहिती दिली. ओलाच्या शोरूमकडे ट्रेड सर्टिफिकेट नसल्याची तक्रार प्रीतपाल सिंग यांनी केली होती. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये हे प्रमाणपत्र नसलेल्या शोरूम बंद करण्यात आल्या. कंपनीने हे प्रमाणपत्र सादर केल्यावर शोरूम सुरू केली जाऊ शकतात, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.राज्यात २०२१ पासून ओलाच्या १,३१,३७४ दुचाकींची विक्री झाली आहे. २०२५ मध्ये १३,२९८ इतक्या दुचाकींची विक्री झाली.
एका वर्षात दोन लाख १२ हजार ई-दुचाकींची विक्रीदेशात आतापर्यंत ओलाच्या ९,०५,८१५ दुचाकींची विक्री झाली. तर, गेल्या आर्थिक वर्षात ओलाने दोन लाख ४४ हजारांपेक्षा अधिक दुचाकींची विक्री केली. त्यातील १२ टक्के विक्री महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात दोन लाख १२ हजार इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली.
महसूल घटलाजूनमध्ये संपलेल्या तिमाहीत ओला इलेक्ट्रिकचा महसूल ४९.६ टक्क्यांनी घसरून ८२८ कोटींवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,६४४ कोटींचा महसूल मिळाला होता. मात्र, गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात ३५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीला या तिमाहीत ४२८ कोटी रुपयांचा तोटा झाला गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये २३.३ टक्के वाढ झाली आहे.