मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा १०० टक्के प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. याची पुरेपूर कल्पना मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि रायगडमधील महाविद्यालयांना आहे. मात्र तरीही आॅफलाइन प्रवेश हवा असेल, तर उपसंचालक कार्यालयातून पत्र आणावे, अशी दिशाभूल करणारी माहिती महाविद्यालयांतून दिली जात आहे. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांची मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालय महाविद्यालयांना तंबी देणार असल्याचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.केवळ महाविद्यालयांतील गर्दी टाळण्यासाठी काही महाविद्यालये खोडसाळपणा करत असल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर काही महाविद्यालयांमधील दलालांचा आॅफलाइन प्रवेशाचा धंदा बंद झाल्याने संबंधित दलाल विद्यार्थी व पालकांमध्ये रोष निर्माण करण्यासाठी हा मार्ग वापरत आहेत, त्यामुळे सर्वच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये किंवा चुकीचे सल्ले देऊ नयेत, असे पत्र पाठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पुन्हा गोंधळ, पुन्हा ठिय्यागुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नव्हता, त्यांना सोमवारी आणि मंगळवारी मोबाइलवर मेसेज येणार होते. मात्र सोमवारी सकाळी मेसेज न आल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी पालकांसह उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. या वेळी पोलिसांच्या मदतीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पालकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यालयाचा दरवाजाच बंद केला. उपसंचालकांची भेट होत नसल्याने शेकडो पालकांनी विद्यार्थ्यांसह कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला. त्यानंतर उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी कार्यालयाबाहेर येऊन पालकांना मार्गदर्शन करत शांत केले. तोपर्यंत उपसंचालक कार्यालयाला युद्धभूमीचे रूप आले होते. (प्रतिनिधी)प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी...२५ आणि २६ जुलैला केवळ नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज येतील. मेसेज आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला नाही, त्यांनी ९ आॅगस्ट रोजी नव्याने अर्ज करायचा आहे.ज्या विद्यार्थ्यांनी याआधी अर्ज भरलेला नाही, किंवा अर्धवट अर्ज भरलेला आहे, त्यांनी ३० जुलै ते २ आॅगस्टदरम्यान अर्ज पूर्ण भरायचा आहे. त्यांच्यासाठी ४ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीमधील महाविद्यालयात ५ व ६ आॅगस्ट रोजी जाऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल.ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे किंवा विषय चुकीचा निवडला आहे किंवा शाखा बदल करायचा आहे किंवा प्राधान्यक्रम चुकला आहे, त्यांनी ९ आॅगस्टला नव्याने अर्ज भरावा. या विद्यार्थ्यांसाठी ९ ते १३ आॅगस्टदरम्यान पहिली, १८ ते २३ आॅगस्टदरम्यान दुसरी आणि २५ ते ३० आॅगस्टदरम्यान तिसरी विशेष फेरी घेतली जाईल.
आॅफलाइनचे पत्र मिळणार नाही
By admin | Updated: July 26, 2016 01:15 IST