अधिकाऱ्याकडून सहकारी तरुणीचा विनयभंग
By Admin | Updated: August 15, 2016 05:04 IST2016-08-15T05:04:12+5:302016-08-15T05:04:12+5:30
एका कॉर्पोरेट कंपनीतील लक्ष्मण मांगेल (४१) या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीशी गैरवर्तन करून विनयभंग केला.

अधिकाऱ्याकडून सहकारी तरुणीचा विनयभंग
ठाणे : नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत एका कॉर्पोरेट कंपनीतील लक्ष्मण मांगेल (४१) या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तिने मोठ्या धाडसाने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आता हा गुन्हा ठाणेनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील ‘टाटा एआयए’ या कंपनीत ही तरुणी नोकरीला असून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याच कंपनीत व्यवस्थापक असल्याचा गैरफायदा घेत लक्ष्मण मांगेल याने तिच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी लगट करण्याचाही प्रयत्न केला. महत्त्वाच्या मीटिंगसाठी बोलवून एका रूममध्ये तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंगही केला. एवढ्यावरही न थांबता तिला अश्लील लघुसंदेश (एसएमएस) पाठवून पुन्हा विनयभंग केला. या प्रकाराला विरोध केल्यास कामावरून काढून टाकण्याची तसेच कुटुंबाला ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली.
१४ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास नौपाडा पोलीस ठाण्यातून हे प्रकरण ठाणेनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्यामुळे यातील कथित आरोपी लक्ष्मणला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सुषमा वायदंडे या याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
> कंपनी व्यवस्थापकाचा प्रताप
‘टाटा एआयए’ या कंपनीत ही तरुणी नोकरीला असून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याच कंपनीत व्यवस्थापक असलेल्या लक्ष्मण मांगेल याने हे कृत्य केले.