राज्यात क्षयरोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:29 AM2019-12-15T06:29:25+5:302019-12-15T06:29:37+5:30

आरोग्य विभाग; २८ टक्के मृत्यू अधिक, निदान झालेल्या ३२ पैकी एकाला गमवावा लागतो जीव

The number of tuberculosis patients has increased in the state | राज्यात क्षयरोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

राज्यात क्षयरोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

googlenewsNext

स्नेहा मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात २०१७च्या तुलनेत क्षयरुग्णांच्या मृत्यंूमध्ये २८ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे, रुग्णांची संख्याही वाढतच असून, त्यात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याला क्षयरोगाचा विळखा बसत असल्याचे चित्र आहे.
आरोग्य विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, देशभरात महाराष्ट्र क्षयरुग्णांच्या नोंदणीत दुसºया स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. २०१७ साली राज्यात १ लाख ९२ हजार ५४८ रुग्ण आढळले होते, तर २०१८ साली ही संख्या २ लाख ९ हजार ६४२च्या घरात पोहोचली आहे. क्षयरोगाचे निदान झालेल्या ३२ पैकी एका व्यक्तीचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे.


राज्यात २०१७ साली क्षयरुग्णांच्या मृत्यूंची संख्या ५ हजार ६६ होती, तर २०१८ साली ६ हजार ४७६ एवढी नोंद झाली आहे. मार्च, २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात राज्यात १ हजार ४४१ बालकांना जन्मत: क्षयरोग झाल्याचे समोर आले.
विशेषत: मुंबईत ६५९ बालकांना जन्मत: क्षयाचे निदान झाले होते. शासकीय रुग्णालयात १ हजार ३७१ बालकांना क्षयाचा संसर्ग झाल्याचे आढळले होते, तर खासगी रुग्णालयातही ७० बालकांना जन्मत: क्षयरोगाचे निदान झाले होते. दरवर्षी क्षयाच्या एक कोटीहून अधिक रुग्णांची जगभरात नोंद होते.

क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य
क्षयरोगाचे आव्हान मोठे असले, तरी योग्य पथ्यपाणी, नेमके उपचार आणि नियमित व्यायाम यांंनी क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. प्रत्येक रुग्णाने योग्य काळजी घेतली, तर क्षयरोगाचा प्रसारही थांबविता येईल. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आणि समतोल आहार घेतल्यास क्षयापासून बचाव करणे शक्य आहे. सकाळी उपाशीपोटी बाहेर पडू नये. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल-कपडा घेणे याची सवय सर्वांनाच लागली पाहिजे. दिवसाकाठी पुरेसा आराम, झोप आणि व्यायाम, यामुळे शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

आरोग्य विभागाच्या क्षयरोग विभागप्रमुख डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले की...
गेल्या काही वर्षांत खासगी क्षेत्रातील क्षयरुग्णांची नोंदणीही वाढली आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय पातळीवर खासगी क्षेत्रातील ४० टक्के रुग्णसंख्येची नोंद वाढली आहे. क्षय निर्मूलन व नियंत्रणासाठी राज्यस्तरीय क्षयरोग मंच गठित करण्यात आला असून, या मार्फत राज्यभरात विविध पातळ्यांवर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. रोगाचे निदान वेळीच केल्यास, तसेच त्यासाठी आवश्यक चाचण्या, उपचार व जनजागृती केल्यास क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

Web Title: The number of tuberculosis patients has increased in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.