महाराष्ट्रातील कुपोषित बालकांची संख्या घटली
By Admin | Updated: August 22, 2014 15:12 IST2014-08-22T12:46:13+5:302014-08-22T15:12:53+5:30
'कुपोषणरहित महाराष्ट्र' हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम यशस्वी ठरत असून राज्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली असून जागतिक पातळीवर याचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्रातील कुपोषित बालकांची संख्या घटली
जागतिक स्तरावरही कौतुक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - 'कुपोषणरहित महाराष्ट्र' हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम यशस्वी ठरत असून राज्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली असून जागतिक पातळीवर याचे कौतुक होत आहे. 'युनिसेफ' या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे.
राज्यातील दोन वर्षांखालील तीव्र कुपोषणग्रस्त मुलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून २००५-०६ वर्षाच्या ३९ टक्क्यांच्या तुलनेत २०१२ साली हे प्रमाण २३ टक्के इतके कमी झाले. तर अतीतीव्र कुपोषणाने ग्रस्त बालकांची संख्या २००५-०६ साली १५ टक्के होती , ती २०१२मध्ये ८ टक्क्यांवर आली. राज्य शासनाचा हा कार्यक्रम सर्व देशांतील व भारतातील 'सर्वोत्तम' मॉडेल आहे, अशा शब्दांत 'युनिसेफने' या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे येथील ग्रामीण व शहरी भागांतून दोन वर्षांखालील मुलांची पाहणी करून 'युनिसेफने' हा अहवाल तयार केला आहे.
तसेच जगातील अग्रगण्य मेडिकल जर्नल 'लॅन्सेट'नेही या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. नेतृत्व प्रशासन व समन्वय 'कुपोषण कमी करण्यासाठी' कशाप्रकारे मदत करू शकतात हे एका केसस्टडीमध्ये नमूदही करण्यात आले आहे.