अब की बार...मोदी सरकार
By Admin | Updated: May 17, 2014 02:49 IST2014-05-17T02:49:10+5:302014-05-17T02:49:10+5:30
कोट्यवधी भारतीयांनी टाकलेल्या विश्वासाच्या लाटेवर स्वार होत नरेंद्र मोदींनी दिल्ली काबीज केली. गुजरातच्या जादूगाराने लोकशाहीत क्रांती घडवून जगाला अचंबित केले.

अब की बार...मोदी सरकार
कोट्यवधी भारतीयांनी टाकलेल्या विश्वासाच्या लाटेवर स्वार होत नरेंद्र मोदींनी दिल्ली काबीज केली. गुजरातच्या जादूगाराने लोकशाहीत क्रांती घडवून जगाला अचंबित केले. कोणत्याही राजकीय घराण्याचा वारसा नसलेल्या मोदींनी काँग्रेसला चारीमुंड्या चीत करून या महान देशाच्या प्रगतीस मुख्य अडसर ठरलेल्या २५ वर्षांच्या आघाडीच्या सत्ताकारणास मूठमाती दिली. गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविण्याची अविश्वसनीय कामगिरी करून मोदींनी भारतीय जनता पार्टीला राजकारणाच्या केंद्रस्थानी प्रस्थापित केले. देशाचा भावी पंतप्रधान आधीच जाहीर करून त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचा अनोखा प्रयोग भाजपाने केला व देशाला खंबीर व निर्णायकी नेतृत्व मिळावे यासाठी व्याकूळ झालेल्या मतदारांनी हा प्रयोग अक्षरश: डोक्यावर घेतला. असह्य ऊन-पावसाची पर्वा न करता ६६ टक्के एवढ्या न भूतो प्रमाणात मतदार घराबाहेर पडले तेव्हाच या सत्तांतराची स्पष्ट चाहूल लागलेली होती. पण हे मतदान राजकारणाची दिशा कायमस्वरूपी बदलण्याच्या दृढ इराद्याने केले आहे याचा पुसटसा अंदाजही त्यांनी भल्याभल्यांना लागू दिला नव्हता. त्यामुळे शुक्रवारच्या निकालांनी यशाची अपेक्षा असलेल्यांनाही थक्क केले. मोदींच्या हाती सत्ता सोपवायला देशातील ८० कोटी मतदार वेडा नाही, अशा मग्रुरीत असलेल्या काँग्रेसला मतदारराजाने वेड्यात काढले. मतदानाचा कल स्पष्ट होताच देशभर उत्साह संचारला. प्रत्येक शहरात व प्रत्येक रस्त्यावर भगवा विजयोत्सव साजरा होत असताना बेशुद्धावस्थेत गेलेली काँग्रेस सायंकाळी शुद्धीवर आली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी लोकांपुढे येऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारत मोदींचे नाव न घेता नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेला आणि देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारा पहिला नेता आणि स्वतंत्र भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळविणारा उमेदवार अशा दोन ऐतिहासिक नोंदींचे धनी ठरलेल्या मोदींनी विजयानंतर बडोदेकरांच्या साक्षीने देशभरातील जनतेशी संवाद साधला. प्रचाराला सुरुवात करताना, अब अच्छे दिन आएंगे, असा आशावाद जागविणार्या मोदींना ‘अब अच्छे दिन आ गए’ अशा घोषणा देत बडोदेकरांनी डोक्यावर घेतले. निकालानंतरच्या या पहिल्याच भाषणात यापुढे शरीराचा प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या विशाल भारतासाठी वेचण्याचे अभिवचन मोदींनी दिले. वाजपेयींच्या कारकिर्दीचा काव्यसंग्रह ५१ कवितांचा होता. या निवडणुकीत मोदींनी मिळविलेले अपूर्व यश ही जणू अटलजींची बावन्नावी कविता ठरली आहे.