पोलीस ठाण्यात राहणार आता महिलांचाच ‘अंमल’
By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:32:42+5:302014-10-29T00:44:17+5:30
कामकाज पारदर्शक बनावे यासाठी येथील कामकाजाची संपूर्ण जबाबदारी महिला कॉन्स्टेबलच्या हाती

पोलीस ठाण्यात राहणार आता महिलांचाच ‘अंमल’
एकनाथ पाटील- कोल्हापूर --पोलीस ठाण्यातील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला कॉन्स्टेबल सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी येथील कामकाजाची संपूर्ण जबाबदारी महिला कॉन्स्टेबलच्या हाती सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ठाणे अंमलदारांची भूमिका महिला पोलीस बजावताना दिसत आहेत.
काही ठाणे अंमलदारांच्या अरेरावीच्या बोलण्याने अत्याचारग्रस्त महिला तक्रार देण्यास पुढे येत नव्हत्या. आता मात्र महिला ठाणे अंमलदारांपुढे त्या व्यथा मांडू शकतात. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या या निर्णयामुळे पोलीस दलात रुजू झाल्यापासून पहिल्यांदाच आम्हाला न्याय मिळाला असल्याची भावना महिला पोलिसांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी असून, प्रत्येक पोलीस ठाण्याचा कार्यभार ठाणे अंमलदार सांभाळत असतात. पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक हा फक्त पोलीस ठाण्यावर नियंत्रण ठेवत असतो. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, ठकबाजी, फसवणूक, बलात्कार, गर्दी, मारामारी, बनावट नाणी, अपहरण, आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंग, जुगार, मटका, आदी वेगवेगळे गुन्हे नेहमी प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. ही कामे ठाणे अंमलदार करीत असतात. बहुतांश पोलीस ठाण्यांचे कामकाज ढिम्म पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पोलिसांमध्ये समन्वय राहावा, कामाची जबाबदारी समजावी, तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षमपणे चालावे यासाठी ठाण्यांच्या कारभाराची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचे दिवसभराचे कामकाज महिला पोलीस हाताळत आहेत. त्यांच्या मदतीला तीन पोलीस कर्मचारीही देण्यात आले आहेत.
पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिसांना वायरलेस कक्षामध्ये चोवीस तास ड्युटीसाठी बसविले जात असे. त्याचबरोबर काही महिला आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांची ड्युटी लावली जात असे. तक्रारी ऐकणे व त्या स्टेशन डायरीमध्ये दाखल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जात नसे. त्यामुळे गुन्हे कसे दाखल करतात, कोणत्या गुन्ह्यासाठी कोणते कलम लावले पाहिजे, याबाबत बहुतांश महिला पोलीस अनभिज्ञ आहेत. महिलांनीही सक्षमपणे पुढे येऊन पोलीस ठाण्याचे कामकाज चालवावे, हा उद्देश समोर ठेवून शर्मा यांनी पुरुषांबरोबर महिला पोलिसांनाही एक पाऊल पुढे टाकण्याची संधी दिली आहे.
महिला अधिकारी नियुक्तीची घोषणा कालबाह्य
गुन्ह्यांचा तपास किंवा त्याबाबतच्या मार्गदर्शनाचे अधिकार असलेल्या महासंचालक ते उपनिरीक्षक दर्जापर्यंतच्या महिला राज्यात अवघ्या १२४६ असून, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे गुन्ह्यांची तक्रार ते न्यायालयात आरोपपत्र अशी सर्व कार्यवाही पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच केली जाते. महिलांना नोकरीत ३३ टक्केआरक्षणाचा नियम असला, तरी त्याची पोलीस दलात पूर्तता झालेली नाही. जिल्ह्यात एका तरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी महिलांची नियुक्ती केली जाईल, या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या घोषणेला तीन वर्षे झाली तरी याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.