अबब! राज्यभरात ४४ हजार विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून मारली शाळेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:49 AM2019-08-27T05:49:36+5:302019-08-27T05:50:01+5:30

विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

Now! Thousands of students absent in school across the state for months | अबब! राज्यभरात ४४ हजार विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून मारली शाळेला दांडी

अबब! राज्यभरात ४४ हजार विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून मारली शाळेला दांडी

Next

- अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पटसंख्येअभावी एकेक शाळा बंद पडत असताना शाळेतच न येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत शाळा गाफील आहेत. तब्बल ४४ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. तर दुसरीकडे शिक्षण विभागाच्याच
सरल प्रणालीमध्ये चक्क २ लाख ७५ हजार २८ विद्यार्थ्यांची नावे कोणत्याही शाळेच्या पटावर नोंदविली गेली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. खुद्द विद्या प्राधिकरणानेच ही आकडेवारी जाहीर करत चिंता व्यक्त केली आहे.


ही आकडेवारी जाहीर करत विद्या प्राधिकरणाचे सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ केले आहे. गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रानुसार, पहिली ते बाराव्या वर्गात शिकणाºया २ लाख ७५ हजर २८ विद्यार्थ्यांची नावे सध्या कोणत्याही शाळेच्या पटावर अधिकृतरीत्या नोंदविलेली नाही. संबंधित शाळांनी हे पावणे तीन लाख विद्यार्थी सरल प्रणालीच्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकून ठेवले आहेत. तर दुसरीकडे ४४ हजार ६९८ विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून शाळेतच आलेले नाहीत. हे
पाहता राज्यात अद्यापही शाळाबाह्य मुलांची संख्या लाखाच्या घरात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हानिहाय शाळाबाह्य विद्यार्थी
अहमदनगर ५६५, अकोला ७२८, अमरावती ६१७, औरंगाबाद ६१०, बीड २५४७, भंडारा १२, बुलडाणा ४५१, चंद्रपूर १०७४, धुळे १८१७, गडचिरोली ९८, गोंदिया ११९, हिंगोली ७८४, जळगाव १८५६, जालना ९९२, कोल्हापूर २९६, लातूर ३२९, मुंबई ४६५५, नागपूर ३६, नांदेड १०५४, नंदूरबार २७५४, नाशिक ३४४९, उस्मानाबाद २२५, पालघर ४४१, परभणी २५००, पुणे ८९६८, रायगड ६४५, रत्नागिरी १०७, सांगली २००, सातारा ६६२, सिंधुदुर्ग २३७, सोलापूर ३१४, ठाणे ५०२८, वर्धा ४३, वाशिम ७५ तर यवतमाळ जिल्ह्यात ४१० असे राज्यात एकूण ४४,६९८ विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. यात २३ हजार ८७३ मुली तर २० हजार ८२५ मुलांचा समावेश आहे.

२२७० बालरक्षकांची
फौज काय करतेय?

शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या समता विभागाने राज्यात २२७० शिक्षकांना बालरक्षक म्हणून तयार केले आहे. त्यांना प्रशिक्षितही केले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शिक्षकांनी स्वत:हून ही जबाबदारी पत्करली आहे. आता याच बालरक्षकांचा सक्षमपणे वापर करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्याचे निर्देश सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.

Web Title: Now! Thousands of students absent in school across the state for months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.