नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अधिकारी व संस्थाचालकांनंतर आता पोलीस यंत्रणेच्या टार्गेटवर थेट लाभार्थी शिक्षक आले आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच पोलिसांनी प्रत्यक्ष बनावट आयडीच्या मदतीने वेतन मिळविणाऱ्या शिक्षकांनाच अटक केली आहे. नागपुरातील तीन शिक्षक गजाआड झाले यात दोन महिलांचा समावेश आहे. इतरांवरदेखील लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन दिवसांतील दोन मोठ्या कारवायांमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी गुरुवारी मानेवाडा येथील शिक्षक विद्याभूषण उच्च प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक सतिश विजय पवार (३४, शाहूनगर, मानेवाडा), सहायक शिक्षिका प्रज्ञा विरेंद्र मुळे (३८, सुर्योदयनगर, म्हाळगीनगर) तसेच बोरगावमधील आदर्श प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षिका भूमिका सोपान नखाते (३९, सर्वश्रीनगर, उमरेड मार्ग, दिघोरी) यांना अटक केली आहे. सतिश पवार यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमधील आरंभी गावातील मूळ निवासी आहे. शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाइन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट आयडी तयार केले.
त्या माध्यमातून बोगस शिक्षकांना शासनाकडून वेतनदेखील अदा करण्यात आले. या घोटाळ्यात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी बुधवारीच प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली होती. बोगस शालार्थ आयडी असलेल्या ६३२ शिक्षकांना चौकशीसाठी बोलविण्याची प्रक्रियादेखील शिक्षण विभागाकडून सुरू झाली होती. दरम्यान, पोलिसांनी थेट शिक्षकांनाच अटक केल्यामुळे आता इतरांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरोपींचा ‘सतरा’चा खतराकेवळ बोगस शालार्थ आयडीच्या प्रकरणात आतापर्यंत सतरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात तीन शिक्षण उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, चार लिपीक, दोन शाळा संचालक,दोन शाळा मुख्याध्यापक व तीन शिक्षकांचा समावेश आहे.
तीन शिक्षकांना २२ महिन्यांत २५ लाखांहून अधिक वेतनतीन आरोपींनी अधिकारी व दलालांसोबत संगनमत करून नोकरी मिळवली व त्यातूनच बोगस शालार्थ आयडी तयार केले. सतिश पवार ऑगस्ट २०२३ पासून नोकरीवर होता. तर प्रज्ञा मुळे व भूमिका नखाते या जून २०२४ पासून नियमित वेतन घेत आहेत. या कालावधीतच तिघांनी शासनाकडून २५ लाखांहून अधिकचे वेतन घेतले. या रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असल्याची बाब समोर आल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली.