आता विद्यार्थ्यांच्या दारी ज्ञानगंगा
By Admin | Updated: August 2, 2016 05:26 IST2016-08-02T05:26:17+5:302016-08-02T05:26:17+5:30
गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्यापर्यंत जाणेदेखील शक्य नसते.
_ns.jpg)
आता विद्यार्थ्यांच्या दारी ज्ञानगंगा
योगेश पांडे,
नागपूर- गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्यापर्यंत जाणेदेखील शक्य नसते. अशा मुलांपर्यंत ‘ज्ञानगंगा’ पोहोचावी यासाठी आता ‘इग्नू’तर्फे (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) यावर्षीपासून फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत शिक्षकच दुर्गम भागात जाऊन विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत.
घरी बसूनदेखील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हा ‘इग्नू’चा महत्त्वाचा हेतू असतो. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, हादेखील प्रयत्न करण्यात येतो. नक्षलप्रभावित व विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ‘इग्नू’चे उपकेंद्र आहे. तथापि, अतिदुर्गम भागात राहणाऱ्यांना दोन आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदादेखील तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनदेखील अनेक आदिवासी युवक-युवती उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन ‘इग्नू’ने फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दुर्गम भागात गावोगावी फिरून ‘इग्नू’तर्फे प्रवेश शिबिर घेण्यात येत आहेत. एखाद्या गावातील पंचायत कार्यालय किंवा मोकळ्या सभागृहात अथवा तत्सम सोयीच्या
ठिकाणी हे विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्यात येणार आहेत.
>रोजगाराधिष्ठित अभ्यासक्रमांवर भर
‘इग्नू’च्या या फिरत्या अध्ययन केंद्राच्या माध्यमातून पारंपरिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येईल. प्रात्यक्षिक असलेल्या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणे शक्य होणार नाही. परंतु रोजगाराधिष्ठित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
>गडचिरोलीतील अतिमागास भागातील विद्यार्थ्यांची समस्या लक्षात आल्यानंतरच फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्याचा विचार आला. अंतर्गत भागातील खेड्यांमध्ये जेथे जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी होईल, तेथे शिक्षक जाऊन शिकवतील. हे वर्ग किती अंतराने भरतील किंवा कोणत्या दिवशी भरतील यासंदर्भात विद्यार्थ्यांची सोय पाहिली जाईल.
- डॉ. पी. शिवस्वरूप, संचालक, नागपूर विभागीय केंद्र, इग्नू