असुरक्षित 350 मधील 80 तलावांना पालिकेच्या नोटीसा
By Admin | Updated: June 4, 2014 22:39 IST2014-06-04T20:33:31+5:302014-06-04T22:39:50+5:30
शहरातील महापालिका , खासगी संस्था , तसेच वैयक्तिक मालकीच्या तलावांमधील तब्बल 60 टक्के तलाव पोहण्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

असुरक्षित 350 मधील 80 तलावांना पालिकेच्या नोटीसा
पुणे : शहरातील महापालिका , खासगी संस्था , तसेच वैयक्तिक मालकीच्या तलावांमधील तब्बल 60 टक्के तलाव पोहण्याच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या तलावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. महापालिकेने जलतरण तलावांच्या सुरक्षेच्या तपासणीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
दरवर्षी उन्हाळयात शहरातील जलतरण तलावांवर नागरिक मोठया प्रमाणात गर्दी करतात. या तलावांच्या ठिकणी सुरक्षा साधनांचा अभाव असल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे शहरातील अशा सर्व तलावांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने विशेष समिती नेमली होती. या समितीने तब्बल महिनाभर शहरातील सुमारे 350 तलावांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात 225 हून अधिक तलावांमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा अहवाल या समितीने सादर केला आहे. त्यातील 80 तलावांची सुरक्षा व्यवस्था अधिकच बिकट असून त्यांना तत्काळ सुधारणांसाठी नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. या सुरक्षा साधणांच्या अभावात प्रामुख्याने प्रशिक्षित जीव रक्षक नसणे, जीव रक्षणाचे साहित्य उपलब्ध नसणे, रेक्यू रिंग नसणे, तलावाच्या ठिकाणी जवळील रूग्णालयांचे क्रमांक तसेच इतर सुचना फलक न लावणे, अशा प्रकारच्या सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचे या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दोन तलाव तत्काळ बंद करण्याच्या सूचना
या समितीच्या अहवालानुसार, हडपसर परिसरातील दोन जलतरण तलाव कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने तत्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या दोन्ही तलावांना क्षेत्रीय कार्यालयांकडून नोटीस बजाविण्यात आली असून सात दिवसांच्या आत सुरक्षा मानकांची उपाय योजना न केल्यास हे तलाव पालिकेकडून सिल करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात या सुरक्षा साधनांसाठी महापालिकेकडून स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचेही समितीमधील एका सदस्याने लोकमतशी बोलताना सांगितले.