साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

By विजय दर्डा | Updated: February 24, 2025 10:06 IST2025-02-24T10:05:31+5:302025-02-24T10:06:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप ...

Not the conclusion of the literary conference, but the beginning of the preservation of the Marathi language: Dr. Vijay Darda | साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप नसून मराठी भाषा संवर्धन करण्याची सुरुवात असल्याचे मत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी समारंभात व्यक्त केले. मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी भाषेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सरकारने तातडीने पाउले उचलण्याची गरज आहे. मराठी माणूस पराक्रमी आणि कर्तबगार आहे. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे. त्यामुळे मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जपणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

लोकमत वृत्तपत्राचे तीन कोटी वाचक आहेत. लोकमत दिल्लीतूनही प्रकाशित होतो आहे. यास वाचकांचा पाठिंबा मिळत असल्याचा आनंद आहे. याचा अर्थ लोक मराठी वाचतात. मात्र, पुढच्या पिढ्यांनी मराठी बोलावी आणि त्यांचे मराठीशी नाते घट्ट व्हावे यासाठी आपण काय करीत आहोत? हा खरा मुद्या आहे. ३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत ललित साहित्याचे एकही दुकान असू नये? विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यात पुस्तकाचे एकही दुकान नाही. ग्रंथालये आधीच कमी आहेत. असतील तर अनुदान कमी आहे. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. मग वाचन संस्कृती कशी वाढणार? याकडे डॉ. दर्डा यांनी लक्ष वेधले.

आतापर्यंत तीन, चार महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे याचे उत्तर देवू शकतील, असे डॉ. दर्डा यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही 
शाळा आणि भाषा या दोन्ही गोष्टी शिंदे साहेबांकडे आहेत आणि पैसे द्यायला अजितदादा तयार आहेत. यासाठी शासनाने आणखी काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही. याउलट इंग्रजी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळते? असा मुद्दा डॉ. दर्डा यांनी उपस्थित करताच सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला.

हे संमेलन ऐतिहासिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम या संमेलनाला केले आहे. यामुळे मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक आहे. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. यासाठी 
संजय नहार यांचे कौतुक करायला हवे. 

Web Title: Not the conclusion of the literary conference, but the beginning of the preservation of the Marathi language: Dr. Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.