"अडीच वर्षं नव्हे, तर 6 महिन्यांतसुद्धा..."; मंत्रीपदासंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय घडलं? शिरसाटांनी सगळंच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:19 IST2024-12-15T20:19:02+5:302024-12-15T20:19:56+5:30
शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे...

"अडीच वर्षं नव्हे, तर 6 महिन्यांतसुद्धा..."; मंत्रीपदासंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय घडलं? शिरसाटांनी सगळंच सांगितलं!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले शिरसाट? -
शपथविधी समारंभानंतर, अडीच-अडीच वर्षांची चर्चा झाल्याचे समजते, काय आहे यातील सत्य? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, शिरसाट म्हणाले, "हो... हे सत्य आहे. शिंदे साहेबांनी सर्वांना बोलावून आमची मिटिंग घेतली आणि सर्वांना सांगितले की, आपण चांगले काम करायला हवे. हा अडीच वर्षां कार्यकाळ असणार आहे. जर चांगले काम केले नाही, तर अडीच वर्षांचीही आवश्यकता नाही. सहा महिन्यांतही तुम्हाला घरी बसवले जाईल, असा थेट इशारा त्यांनी सर्वच मंत्र्यांना दिला आहे."
यावेळी, मिळालेल्या मंत्रीपदासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, मला मंत्रीपद मिळेल याची चर्चा होती. अखेर शिंदे साहेबांनी मला न्याय देण्याची भूमिका घेतली, आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मला मिळालेल्या संधीचा योग्य वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देता येईल या भावनेतून मी काम करणार आहे."
उदय सामंतही स्पष्टच बोलले -
अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, "राज्याचे आमच्या शिवसेनेचे नेते, अडीच वर्ष कशाला? उद्या जर दोन महिन्यांनंतर आम्ही परफॉर्मन्स दिला नाही आणि त्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळातून थांबावे लागेल, तरदेखील आम्ही थांबायला हवे. त्यासाठी अडीच वर्षं कशाला? आमची फरफॉर्मन्स देण्याची जबाबदारी आहे. आमच्यावर चांगले काम करण्याची जी जबाबदारी शिंदे साहेबांनी टाकली आहे, त्याला आम्ही पात्र ठरायला हवे. जर आम्ही पात्र ठरलो नाही आणि शिंदे साहेबांनी दोन महिन्यांनी जरी सांगितले की, थांबलं हवे तर आम्ही थांबायला हवे. त्यासाठी प्रतिज्ञापत्राची काय गर?"