नांदेडमध्ये गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव
By Admin | Updated: April 19, 2017 02:40 IST2017-04-19T02:40:27+5:302017-04-19T02:40:27+5:30
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष व मुंबईतील भाजपा आमदार सरदार तारासिंग यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असून त्यांना पदावरुन हटविण्याची शिफारस

नांदेडमध्ये गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव
नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष व मुंबईतील भाजपा आमदार सरदार तारासिंग यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असून त्यांना पदावरुन हटविण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात आली आहे़ बोर्डाचे उपाध्यक्ष सरदारभूपेंद्रसिंह मिन्हास यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़
सकाळी नाराज सदस्यांची बैठक झाली. बैठकीला सरदार तारासिंग अनुपस्थित होते. बैठकीत एकूण पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले़ त्यात १० एप्रिल २०१७ रोजी मुंबई येथे घेतलेल्या गुरुद्वारा बोर्डाच्या बैठकीतील सर्व निर्णय रद्द करण्यात आले़ सरदारपरमज्योत सिंह चाहेल यांना पुन्हा सचिव पदावर नियुक्त करण्यात आले़
मुंबईच्या बैठकीत आमदार तारासिंग यांनी चाहेल यांना हटवून भागेंद्रसिंग घडीसाज यांची नियुक्ती केली होती़ दुसऱ्या प्रस्तावानुसार अध्यक्षांना दिलेले अधिकार रद्द करुन आ. तारासिंग यांच्या कार्यकाळातील अनियमिततेची तपासणी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन्याचा निर्णय झाला. अध्यक्षपदाचे सर्व अधिकार शेरसिंग फौजी यांना बहाल करण्यात आले. शिक्षण समितीचे चेअरमन अॅड़ अमरिकसिंग वासरीकर यांना हटवून त्यांच्या जागी सरदार राजेंद्रसिंग पुजारी यांची नियुक्ती झाली़ बैठकीला बोर्डाचे १७ पैकी १० सदस्य उपस्थित होते़ (प्रतिनिधी)