कुणाला मिळाले यश अन् आश्वासन!
By Admin | Updated: December 25, 2014 00:25 IST2014-12-25T00:25:28+5:302014-12-25T00:25:28+5:30
न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी वेगवेगळ्या ७१ संघटनांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पटवर्धन मैदानात १७ दिवस धरणे आंदोलन, उपोषण केले. त्यातील काही संघटनांच्या मागण्या पूर्ण झाल्या,

कुणाला मिळाले यश अन् आश्वासन!
१७ दिवसांत ७१ संघटनांचे धरणे आंदोलन : ११५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त
गणेश खवसे - नागपूर
न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी वेगवेगळ्या ७१ संघटनांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पटवर्धन मैदानात १७ दिवस धरणे आंदोलन, उपोषण केले. त्यातील काही संघटनांच्या मागण्या पूर्ण झाल्या, काहींना आश्वासन मिळाले तर मोजक्या संघटना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मागण्यांवर ठाम होत्या. यावर्षी प्रथमच तत्परतेने आंदोलकांची संबंधित मंत्री, विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून त्यांचे प्रश्न निकाली लावण्याचे काम करण्यात आले, हे विशेष!
हिवाळी अधिवेशन काळात धरणे आंदोलन करण्यासाठी पटवर्धन मैदानाची जागा निश्चित करण्यात आली आहे. तेथे ८ डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार संघटनांनी धरणे आंदोलन केले. ९ डिसेंबरला ७, १० डिसेंबरला ८ तर ११ डिसेंबरला तब्बल ११ संघटनांची त्यात भर पडली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी १२ डिसेंबरला ६ संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केले. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी १५ डिसेंबरला १५, १६ डिसेंबरला ९, १७ डिसेंबरला ३, १८ डिसेंबरला ४ आणि १९ डिसेंबरला १ याप्रकारे धरणे आंदोलन करणाऱ्या संघटनांची भर पडली. अखेरच्या आठवड्यात २२ डिसेंबरला २ आणि २३ डिसेंबरला केवळ १ अशा एकूण ७१ संघटनांनी अधिवेशनाच्या १७ दिवसांत धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनासाठी एकूण ११५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी अशाप्रकारे सुरक्षा व्यवस्था होती. ११५ पोलिसांमध्ये पोलीस अधीक्षक (एस. एस. वळवी, नाशिक), एक नोडल आॅफिसर (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा) बाजीराव पोवार, चार पोलीस निरीक्षक (दोन पुणे ग्रामीण आणि दोन औरंगाबाद ग्रामीण), सहा पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला पोलीस उपनिरीक्षक, १०१ पोलीस कर्मचारी (महिला आणि पुरुष) यांचा समावेश होता. धरणे आंदोलनादरम्यान येथे कोणतीही अनुचित घटना झाली नाही. आंदोलकांनीही पोलिसांना सहकार्य केले. वैद्यकीय सेवासुद्धा येथे पुरविण्यात आली होती. रात्रीसुद्धा डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सूचना पोलिसांनी केली होती.रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यानी रात्रीसुद्धा ड्युटी बजाविली. धरणे आंदोलन करणाऱ्यांना सर्वाधिक भेट देणाऱ्या मंत्र्यांमध्ये अग्रक्रम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा लागतो. त्यांनी धरणे मंडप स्थळी हजेरी लावली. काही संघटनांनी केवळ धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. त्यांनी साखळी उपोषण केले काहींनी तर आमरण उपोषणही सुरू केले. मात्र त्यांनाही आम्ही सहकार्य केले, असे पोवार यांनी सांगितले.
अनेक संघटनांचे समाधान
आम्ही सर्वप्रथम धरणे आंदोलन करणाऱ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. त्यांना विश्वासात घेऊन संबंधित मंत्री, विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची भेट घालून दिली. अनेक संघटनांचे तेथे समाधान झाले, आश्वासन मिळाले. यामुळे ज्या दिवशी आंदोलन सुरू झाले, त्याच दिवशी अनेक संघटनांनी आंदोलनाची सांगता केली. हे आमचे यश आहे.
बाजीराव पोवार,
पोलीस निरीक्षक (नोडल आॅफिसर), गुन्हे शाखा, नागपूर.