"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:19 IST2026-04-08T18:00:32+5:302026-04-08T19:19:33+5:30
शिवसेना पक्ष केवळ राजकीय नव्हे तर सर्वसमावेशी विकासाभिमुख पर्याय म्हणून स्वतःची ओळख मजबूत करण्याच्या प्रयत्न करणार आहे

"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
मुंबई - निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरु झालाय. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले. मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामचुकार पदाधिकाऱ्यांना दिली.
नुकतेच शिवसेनेकडून संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महत्त्वपूर्ण ऑनलाईन आढावा व मार्गदर्शन बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना पद विसरुन कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले. मतदार संघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्क प्रमुखांना कामाचा रोडमॅप दिला. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेऊन त्या बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज मला पाठवावा तो मी स्वतः बघणार असं शिंदेंनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या ‘SIR’ मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती बीएलए नेमले, कितीवेळा मतदार संघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या? याची विचारणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्कप्रमुखांना केली. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार असा सज्जड दम शिंदेंनी या बैठकीत दिला. मतदार संघाचे विभाजन लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदार यादींचे बारकाईने पुनरावलोक करण्यासाठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत तसेच ‘बीएलए’सोबत रोज बैठक घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या.
संपर्क प्रमुखांना केलेल्या सूचना
मतदार संघाचा दौरा करणे, बैठका घेणे
मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करा
‘एसआयआर’साठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत
‘बीएलए’सोबत दररोज बैठक घेणे
लोकसभा संपर्कप्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेणे
बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज पाठवणे
नुकताच केली होती संपर्क प्रमुखांची घोषणा
शिवसेनेने विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुखांची, लोकसभा संपर्क प्रमुखांची नुकताच घोषणा केली होती. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत, निलेश राणे, दिलीप लांडे, तुकाराम काते, किशोर पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.