Narahari Jirwal on Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने एकहाती सत्ता मिळवली होती. लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींचे आभार मानले होते. मात्र निवडणुकीआधी जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने निवडून आल्यास लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने अद्याप त्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. अशातच महायुती सरकाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूष असल्याचे म्हटलं आहे. लाडक्या बहिणींच्या एप्रिलच्या हप्त्यावरुन सरकारची टोलवाटोलवी सुरु आहे. अशातच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटले नाही असं विधान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये पुरेशे आहेत असेही नरहरी झिरवाळ म्हणाले. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं असताना नरहरी झिरवाळ यांनी मोठं विधान केले आहे.
"लाडक्या बहिणी नाराज आहेत हे फक्त विरोधकच सांगत असतात. सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूष आहेत. २१०० रुपये देणार असं कोणी जाहीर केलेले नाही. विरोधकांनी आधी म्हटलं की महायुती लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे १५०० रुपये देण्याची ऐपत नाही. त्यानंतर त्यांनी म्हटलं की २१०० रुपये देणार आणि मग १५०० रुपये दिले नाहीत तर २१०० कसे देणार? अशा पद्धतीचे आरोप सुरु केले होते. १५०० रुपये दिल्यावर त्यांनी २१०० रुपयांव जोर धरला. तो असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना १५०० रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत," असे विधान नरगही झिरवाळ यांनी केले.
दरम्यान, एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरीत केला जाणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. मात्र महिना संपायला तीन दिवस उरलेले असताना अद्यापही योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. त्यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे केव्हा जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलं आहे.