no inquiry of land purchasing for samruddhi mahamarg kkg | समृद्धी महामार्ग जमीन खरेदीची चौकशीच नाही; पृथ्वीराज चव्हाण संतप्त

समृद्धी महामार्ग जमीन खरेदीची चौकशीच नाही; पृथ्वीराज चव्हाण संतप्त

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची अंतिम अधिसूचना निघण्यापूर्वी या महामार्गालगत, राजकीय नेते, मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी वा त्यांच्या नातेवाइकांनी केलेल्या जमीन खरेदीची चौकशीच न केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत संताप व्यक्त केला. अधिसूचनेनंतरच्या जमीन खरेदीची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात आली होती आणि त्यात कुठलाही गैरव्यवहार आढळला नाही, असे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावरून विरोधक सभागृहात प्रचंड गदारोळ करत असतानाच या समृद्धीच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि गदारोळातच प्रश्न गुंडाळला गेला. मात्र, त्या आधी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की अधिकारी वा त्यांच्या नातेवाइकांनी समृद्धीलगत जमिनीची खरेदी केल्यानंतर अंतिम अधिसूचना काढण्यात आली आणि याच लोकांनी मग शासनाकडून जमिनीचा चौपट मोबदला घेतला.

हा घोटाळा मोठा असून त्या बाबत चौकशीची मागणी आपण तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या बाबतचे पुरावेदेखील दिलेले होते; पण नेमकी तीच चौकशी झाली नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला.

विरोधकांचा गदारोळ; चव्हाण हतबल
खुल्या बाजारातून ७.३% व्याजदराने कर्ज उपलब्ध होत असताना या प्रकल्पासाठी ९.७५% दराने कर्ज घेणार असल्याने वाढीव दराने कर्ज घेण्याची नेमकी कारणे काय अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मात्र, शिंदे यांनी हे खरे नसल्याचे सांगत कर्जावर असलेला व्याजदर प्रचलित दरापेक्षा किफायतशीर असल्याचा दावा उत्तरात केला. विरोधकांच्या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास संपल्याने चव्हाण यांना त्यांचा प्रश्न रेटताच आला नाही.

समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधान भवनात समोरासमोर भेट झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून नमस्कार केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: no inquiry of land purchasing for samruddhi mahamarg kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.