बँकेत ई-मेल आयडीची सक्ती नको
By Admin | Updated: September 22, 2016 20:32 IST2016-09-22T20:32:00+5:302016-09-22T20:32:00+5:30
बँकांनी ग्राहकांना ई-मेल आयडी देण्याची सक्ती करू नये यासाठी एका वृद्ध दाम्पत्याने लिहिलेल्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका म्हणून दखल घेतली आहे.

बँकेत ई-मेल आयडीची सक्ती नको
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २२ : बँकांनी ग्राहकांना ई-मेल आयडी देण्याची सक्ती करू नये यासाठी एका वृद्ध दाम्पत्याने लिहिलेल्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका म्हणून दखल घेतली आहे. प्रभाकर व प्रमिला किन्हेकर असे व्यथित दाम्पत्याचे नाव असून ते सीताबर्डी येथील रहिवासी आहेत. पत्रातील माहितीनुसार, त्यांचे युको बँकेत बचत खाते आहे. तसेच, त्यांनी काही रकमेची मुदत ठेव ठेवली आहे. त्यांचे उत्पन्न करपात्र नाही. यामुळे त्यांनी गेल्या एप्रिलमध्ये बँकेला १५एच अर्ज भरून दिला. बँकेच्या अधिकाऱ्याने आवश्यक बाबी तपासून अर्ज ठेवून घेतला. आता त्यांना ई-मेल आयडी मागण्यात आला आहे. ई-मेल आयडी नसल्यास अर्ज अपूर्ण समजून व्याजावर टीडीएस कपात करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.
यामुळे हे दाम्पत्य अडचणीत सापडले आहे. ई-मेल आयडी हे काय उपकरण आहे हे आपल्याला माहीतच नसल्याचे व हे उपकरण खरेदी करण्याची आपली ऐपत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ई-मेल आयडीला उपकरण संबोधून त्यांनी याबातची अनभिज्ञता स्पष्ट केली आहे. याप्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. अनिल किलोर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. तसेच, त्यांना यासंदर्भात दोन आठवड्यांत नियमानुसार याचिका सादर करण्याचे निर्देश दिलेत.