मुंबई/त्र्यंबकेश्वर/शहादा/भुसावळ/कोपरगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी राज्यात घेतलेल्या चार सभांमध्ये कुठे वेगळे तर कुठे सोबत लढत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर सोडाच पण शरद पवार, उद्धव ठाकरे वा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही कोणतीच टीका केली नाही. कोणाचाही नामोल्लेखदेखील न करता आपण विकासासाठी मते मागायला आलो आहोत असे सांगितले.
त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ आणि कोपरगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस यांच्या सभा झाल्या. एरवी विरोधकांवर तुटून पडणारे फडणवीस यांनी मी कोणावर टीका करायला आलो नाही, कोण कमी कोण जास्त हे सांगायला आलो नाही, कोणाच्या विरोधात मला मते मागायची नाहीत, असे म्हणत आपल्या शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. कोपरगावच्या सभेत विकासासाठी दिलेला ‘विश्वासनामा‘ अमलात आणणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनेत्र्यंबकेश्वर हे देशातील आदर्श तीर्थक्षेत्र घडविणार, हे करताना कोणालाही विस्थापित करणार नाही.भुसावळमध्ये जानेवारीत मोठा वस्रोद्योग आणण्याची घोषणा आपण करू. दीपनगर; भुसावळ येथे आणखी ८०० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प आणणार.अतिक्रमणधारकांना जमिनीच्या मालकीहक्काचे पट्टे देणार, शहरांमध्ये सर्वसामान्यांना हक्काची घरे देणार.मी मुख्यमंत्री आहे तोवर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
साडेतीनशे शहरांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट राज्यातील साडेसहा कोटी जनता ही साडेतीनशे लहान शहरांमध्ये राहते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान शहरांच्या विकासाचा कार्यक्रम दिलेला आहे. १ लाख कोटी रुपये दिलेले आहेत. या शहरांच्या विकासाची माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे, ते आम्ही करून दाखवू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
छोट्या शहरांचा केलेला विकास आणि पुढचे व्हिजन गेली काही वर्षे राज्यात सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर टोकाची टीका करत असताना फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात सकारात्मक दृष्टिकोन ठेवत राज्य आणि केंद्र सरकारने छोट्या शहरांचा केलेला विकास आणि पुढचे व्हिजन मांडले. फडणवीस यांच्या सोमवारी सभा झाल्या तेथे काही ठिकाणी विरोधकांनी भाजपला आव्हान दिले आहे. फडणवीस यांच्या या प्रचारशैलीला विरोधक कसे प्रत्युत्तर देतात या बाबत उत्सुकता असेल.