तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लावणार
By Admin | Updated: June 30, 2016 04:05 IST2016-06-30T04:05:17+5:302016-06-30T04:05:17+5:30
राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे.

तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लावणार
जीवन रामावत,
नागपूर- राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात केवळ २० टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) सर्जन भगत यांनी सांगितले.
येत्या १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने पीसीसीएफ भगत यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील २० टक्के वनाच्छादित असले तरी, यापैकी केवळ १६ टक्के क्षेत्रावरच घनदाट जंगल असून, इतर चार टक्के हा विरळ आहे. त्यामुळे या चार टक्के क्षेत्रावरील जंगल अधिक घनदाट करून, राज्यातील वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे भगत म्हणाले. या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात वन विभागाने १ कोटी ५० लाख वृक्ष लागवडीची जबाबदारी स्वीकारली आहे. उर्वरित ५० लाख वृक्ष लागवड ही शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी
वृक्ष लागवडीसाठी वन विभाग पूर्णत: सज्ज झाला आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी २५ जूनपर्यंत आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. तब्बल तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी झाली असल्याचे भगत यांनी सांगितले. तसेच राज्यभरात तीन कोटी एक लाख खड्डे खोदून तयार असल्याचेही ते म्हणाले.
पुढील तीन वर्षांचा ‘प्लॅन’ तयार
राज्य शासन आणि वन विभागाने राज्यातील ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याचे भगत यांनी सांगितले. त्यानुसार पुढील वर्षी आणखी तीन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार असून, त्यानंतर २०१८मध्ये १८ कोटी व २०१९ मध्ये २० कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच वन विभागाने नियोजन सुरू केले असून, नर्सरी तयार केल्या जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड झाली, तरी बऱ्यापैकी वनाच्छादित क्षेत्र तयार होईल, असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.
प्रथमच आॅनलाइन रिपोर्टिंग
या मोहिमेत प्रथमच अत्याधुनिक साधनसुविधांचा उपयोग केला जात आहे. आजपर्यंत वृक्ष लागवड ही केवळ कागदावरच होत होती. परंतु यावेळी तो सर्व प्रकार टाळण्यासाठी ‘आॅनलाईन रिपोर्टिंग’ केले जात आहे. शिवाय यात झाड लावण्यात येणाऱ्या खड्ड्याच्या छायाचित्रासह ते झाडे कोठे लावण्यात आले, त्याचे जीपीएस लोकेशन व लावण्यात आलेल्या झाडाचे छायाचित्र घेतले जाणार आहे. अशाप्रकारे १ जुलै रोजी सकाळी ६ वाजतापासून तर रात्री ८ वाजतापर्यंत प्रत्येक दोन तासांत किती वृक्ष लागवड झाली, याचा डाटा गोळा केला जाणार आहे.
एक हजार झाडांसाठी
एक व्यक्ती
लागवड झालेल्या एकूण झाडांपैकी किमान ८० टक्के झाडे जगविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीनंतर प्रत्येक एक हजार झाडामागे एक व्यक्ती अशी जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
शिवाय इतर शासकीय यंत्रणा आणि खासगी संस्थांनीसुद्धा त्यांनी लावलेली झाडे जगविण्याची स्वत: जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशाप्रकारे पुढील चार वर्षांपर्यंत या सर्व झाडांचे मॉनिटरिंग होणार असल्याचेही पीसीसीएफ भगत यांनी सांगितले.