नवीन सिमेन्स लोकल मध्य रेल्वेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 04:58 IST2017-01-14T04:58:51+5:302017-01-14T04:58:51+5:30
पाच वर्षांनंतर मुंबईतील मध्य रेल्वेत सिमेन्स कंपनीची नवीन लोकल दाखल झाली आहे. सिमेन्स कंपनीची नवीन लोकल जानेवारी

नवीन सिमेन्स लोकल मध्य रेल्वेत दाखल
मुंबई : पाच वर्षांनंतर मुंबईतील मध्य रेल्वेत सिमेन्स कंपनीची नवीन लोकल दाखल झाली आहे. सिमेन्स कंपनीची नवीन लोकल जानेवारी महिन्यात दाखल होणार होती. त्यानुसार लोकल दाखल झाल्यानंतर लवकरच सीएसटी ते कल्याण मार्गावर ही लोकल चालवण्याचे नियोजन आहे.
सध्या मध्य रेल्वे मार्गावर १२२ लोकलच्या दिवसाला जवळपास १,६00 फेऱ्या होतात. १२२ लोकलपैकी ७0 सिमेन्स बनावटीच्या बारा डब्यांच्या लोकल आहेत, तर उर्वरित लोकल या रेट्रोफिटेड आणि बीएचईएलच्या आहेत. आता या लोकलच्या ताफ्यात आणखी एक सिमेन्स कंपनीची लोकल दाखल झाली. आणखी दोन लोकल मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल होतील. एमयूटीपी-१ अंतर्गत नव्या सिमेन्स लोकल मध्य व पश्चिम रेल्वेला मिळत होत्या. २0११ सालापर्यंत मध्य रेल्वेवर लोकल आल्यानंतर यातील तीन लोकल येणे बाकी होत्या. चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यातून या लोकलची बांधणी करून त्या दाखल होणे अपेक्षित होते. मात्र त्याआधी बम्बार्डियर कंपनीच्या लोकल बांधून त्या पश्चिम रेल्वेवर दाखल करण्यात आल्या. त्यानंतर आता सिमेन्स कंपनीच्या तीन लोकल दाखल करण्याचा निर्णय झाला. एक नवी लोकल मध्य रेल्वेत दाखल झाल्यामुळे सध्याच्या लोकलची संख्या १२२ वरून १२३ होईल, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नवी लोकल सीएसटी ते कल्याण दरम्यान चालवण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. ही लोकल दाखल होताच जुन्या लोकलपैकी एखादी लोकल सायडिंगला ठेवून नवीन लोकल चालवण्यात येईल.