साठे महामंडळात नवा कार घोटाळा

By Admin | Updated: July 5, 2015 03:02 IST2015-07-05T03:02:20+5:302015-07-05T03:02:20+5:30

३७५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांसाठी सध्या गाजत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचा नवा कार घोटाळा समोर आला आहे.

New car scam in Sathe Mahamandal | साठे महामंडळात नवा कार घोटाळा

साठे महामंडळात नवा कार घोटाळा

यदु जोशी , मुंबई
३७५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांसाठी सध्या गाजत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचा नवा कार घोटाळा समोर आला आहे.
कारसाठी महामंडळातून ज्यांच्या नावावर कर्ज उचलण्यात आले त्यांच्याकडे या गाड्या पोहोचल्याच नाहीत. तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्यासह त्यांच्या बगलबच्चांना या कार मिळाल्या. विशेष म्हणजे मातंग आणि तत्सम जातींसाठी असलेल्या या महामंडळातून चक्क ब्राह्मण, ठाकूर अन् मुस्लिमांना गाड्या देण्यात आल्या. या प्रकरणी महामंडळाचे मुंबईतील जिल्हा व्यवस्थापक विनोद श्यामराव वायदंडे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. मुंबईतील मेहता सर्व्हिसेस आणि मेहता मोटर्स या दुचाकी वाहनांच्या एजन्सीला महामंडळामार्फत कर्जाऊ कार खरेदीचे कंत्राट देण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपये या एजन्सीला देण्यात आले. कर्ज प्रकरणे ज्यांच्या नावावर तयार करण्यात आली त्यांना कार मिळाल्याच नाहीत. त्या भलत्यांनाच मिळाल्या.
लोकमतला मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार राम महादू शिंदे राजेश दत्तात्रय गायकवाड,भारत ज्ञानदेव जाधव आणि दशरथ विनोद कसब यांच्या नावावर कर्ज दाखविले गेले आणि एजन्सीने आॅडी कार दिली ती बोरीवलीचे शब्बीर एम.मुल्लानी यांना. मुल्लानी यांच्याकडून ती गाडी एमएच ०२ डीआर ७१७१) तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्या सेवेत गेली. संजय साठे आणि नामदेव खलसे यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले पण मर्सिडिज बेंज (एमएम-२१ एव्ही ७१७१) मिळाली ती म्हसाई, ता.अंबड येथील सोपान गायके यांना. लगेच ती गाडी कदम यांच्या दिमतीला गेली आणि आताही त्यांच्याकडेच आहे.
कदम अध्यक्ष असलेल्या बोरीवलीच्या जोशाबा मध्यवर्ती सहकारी संस्थेला प्रत्येकी १४ लाख ३९ हजार रुपये किमतीच्या तीन स्कॉर्पिओ गाड्या उत्तम खंडागळे, प्रवीण कारके आणि सोमनाथ खिलारे यांच्या नावे कर्ज घेऊन देण्यात आल्या.
वेंकट महादू शिंदे यांच्या नावे कर्ज देऊन इन्होवा गाडी देण्यात आली ती जयेश हरेश्वर जोशी यांना. हे महाशय कदम यांनी केलेल्या गैरव्यवहारांचे सर्वात मोठे साक्षीदार मानले जातात. आरटीजीएसने ३३ लाख रुपये काढून तेजस पवार;पोखरण वर्तक नगर, ठाणे यांना तसेच गणपत गोविंद जोशी यांना प्रत्येकी एक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या. गौरव मनोहर साठे यांच्या नावावर कर्ज घेऊन महिंद्रा एक्सयूव्ही ही गाडी कौशल सिंग बोरीवली यांना देण्यात आली. रमेश कदम यांचे बंधू संतोष नागनाथ कदम यांच्या नावे कर्ज घेऊन इन्होवा गाडी त्यांनाच देण्यात आली. गणपत नरसिंग वाघमारे यांच्या नावे कर्ज घेऊन गाडी दिली ती सचिन केळकर (गोरेगाव; मुंबई) यांना. सचिन बाळू साळवे यांच्या नावे कर्ज घेऊन १९ लाख रुपयांची कार दिली ती नरहरी बोडके; गहुंजे, ता.मावळ यांना.

३८५ कोटींच्या घोटाळ्यात अद्याप कारवाई नाहीच
अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची मालिकाच लोकमतने प्रसिद्ध केली. ढळढळीत पुरावे दिले. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सीआयडीने चौकशी पूर्ण केल्याचे सांगण्यात येते. सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांनी दिलेला चौकशी अहवाल धूळ खात पडला आहे. मंत्रालयात कारवाई अडविली जात आहे.

या गाड्या अशा आल्या
आ. रमेश कदम यांच्याकडे सध्या असलेली आॅडी आणि मर्सिडिज बेंज या महागड्या गाड्या महामंडळाच्या पैशांतून आल्याचे या घोटाळ्याने उघड झाले आहे. या व इतर सर्व गाड्या कोणाच्या नावावर घेण्यात आल्या याची माहिती ‘लोकमत’ने आरटीओमधून मिळविली.

Web Title: New car scam in Sathe Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.