अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई
कधी काळी म्हणजे २००९ मध्ये मुंबईत लोकसभेचे ६ पैकी ५ खासदार आणि विधानसभेचे ३६ पैकी १६ आमदार काँग्रेस पक्षाचे होते. कालांतराने काँग्रेसचे घर मोडकळीला येत गेले. त्यानंतर २०१४/२०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचे शून्य खासदार आणि फक्त चार आमदार उरले. २०२४ मध्ये महाविकास आघाडीमुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या एकमेव खासदार निवडून आल्या. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या वेळी काँग्रेसचे फक्त तीन आमदार निवडून आले. संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये आज काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई या संपूर्ण बेल्टमध्ये काँग्रेसचे कोणतेही दखलपात्र कार्यक्रम चालू नाहीत. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलनही सुरू नाही.
ज्या-ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी काँग्रेस जिल्हा मानून अध्यक्षपद देते. यानुसार एमएमआर रिजनमध्ये नऊ महानगरपालिका आहेत. शिवाय रायगड जिल्हा म्हणून काँग्रेसने तेथे महेंद्र घरत यांना अध्यक्षपद दिले आहे. नवी मुंबईत रामचंद्र दळवी, कल्याणमध्ये राजाभाऊ पातरकर, पनवेलमध्ये सुदाम पाटील, उल्हासनगरमध्ये रोहित साळवे प्रभारी अध्यक्ष आहेत. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण तर ग्रामीण काँग्रेस कमिटीला चेतनसिंह पवार प्रभारी अध्यक्ष आहेत. मीरा भाईंदरला प्रमोद सामंत अध्यक्ष असून, जुबेर इमानदार प्रभारी अध्यक्ष आहेत. भिवंडीत रशीद मोमीन, वसई विरारला ओनिल अल्मेडा तर पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पाटील काम पाहत आहेत. ही नावे एवढ्यासाठी की हे लोक तुमच्या क्षेत्रात काय करत आहेत हे तुम्हाला शोधायला सोपे जावे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण एमएमआरमध्ये काँग्रेसला जबरदस्त मार बसला. सर्व ठिकाणी काँग्रेसने काहीही शिल्लक ठेवले नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची ताकद असणारे नेतेही आता या भागात नाहीत.
जो कोणता पक्ष सत्तेत असतो तो तिथल्या विरोधकांना स्वतःच्या कामातून सतत विषय देत असतो. कधी अर्थसंकल्प, कधी राज्य सरकारचे निर्णय, कधी मंत्र्यांनी केलेल्या चुका...अशा अनेक गोष्टी विरोधकांना मिळत असतात. विरोधक जागरूक असेल तर तो अशा गोष्टींवर बारीक लक्ष ठेवतो. पावलोपावली सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप करायचे आणि संध्याकाळी संबंधित मंत्र्याकडे जाऊन स्वतःच्या व्यक्तिगत लाभाच्या फायली मंजूर करून घ्यायच्या असे उद्योग विरोधक करू लागले तर त्या ठिकाणी विरोधकांचे अस्तित्व शून्य उरते. एमएमआर रिजनमध्ये काँग्रेसची अवस्था वेगळी नाही. सतत वेगवेगळे विषय मिळत असतानाही या भागातील काँग्रेस कसलेही आंदोलन करताना दिसत नाही.
गॅस सिलिंडरचे भाव ६० रुपयांनी तर हॉटेलसाठीच्या गॅस सिलिंडरची किंमतही ११४.५० रुपयांनी वाढली. गॅसची अशीच भाववाढ २०११-१२ मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाली होती. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी देशभर सरकार विरोधी वातावरण कसे पेटवले होते, हे काँग्रेस पूर्णपणे विसरून गेली आहे. त्यावेळी भाजप नेत्या स्मृती इराणी गॅस सिलिंडरचे मोठे कटआउट खांद्यावर घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. सर्वसामान्य गृहिणींचा आक्रोश त्यांनी आपल्या आंदोलनातून व्यक्त केला होता. मात्र, शनिवारी गॅसचे दर वाढले तरी आजपर्यंत काँग्रेसच्या एकाही नेत्याने आंदोलनाची भाषा केली नाही किंवा सरकार विरोधी भूमिका घेतली नाही. मुंबईत काँग्रेसने गॅस सिलिंडर भाववाढीवरून आंदोलन केले तर त्याचे पडसाद देशभर उमटतील. मात्र, असे आंदोलन करायचे तर विद्यमान सरकारची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. ते करण्याची काँग्रेसच्या एकाही नेत्याची इच्छाशक्ती नाही.
आता कुठल्याही निवडणुका नाहीत. मग कशासाठी आंदोलन करायचे, असे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असावे. असे वाटणाऱ्या नेत्यांनी सर्वस्व गमावल्यानंतरही उभे राहण्याची धडपड कशी असते, यासाठी राज ठाकरे यांच्याकडे बघावे. मनसेचा आजच विसावा वर्धापन दिन आहे. त्यासाठी राज ठाकरे स्वतः रायगडावर जात आहेत. त्यानंतर राज्यभर पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. नोंदणी कशी व कोणाची करायची यासाठीचे अपील त्यांनी सर्वत्र दिले आहे. ते वाचून जरी काँग्रेस नेत्यांना काही करण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली तरी ते राज ठाकरे यांचे यश मानावे लागेल.
मुंबई काँग्रेसमध्ये आजी-माजी काँग्रेस अध्यक्षांमधून आडवा विस्तव जात नाही. विद्यमान अध्यक्षांनी केलेली कोणतीही कृती माजी अध्यक्षांना चुकीची वाटते. माजी अध्यक्षांनी केलेल्या कोणत्याही सूचना विद्यमान अध्यक्षांना त्यांच्या व्यक्तिगत विरोधासाठी आहेत असे वाटते. मुंबईत एक बरे आहे एकमेकांशी वादावादी करायला काँग्रेसमध्ये पुरेसे नेते तरी आहेत. ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई या भागात तर काँग्रेसमध्ये आपापसात भांडायला नेतेही उरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने आता ‘टॅलेंट हंट’ ही मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून राज्यभर काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते नेमण्याचे काम केले जात आहे. ‘टॅलेंट हंट’ करून प्रवक्ते नेमले जातील; पण ज्या पक्षासाठी हे प्रवक्ते काम करतील तो पक्ष आणि त्या पक्षाचे सगळेच जुने जाणते नेते आता ‘हंट’ करण्याची वेळ आली आहे त्याचे काय..? फार कशाला जे नेते महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते ते तरी सध्या कुठे आणि काय करत आहेत हे ‘हंट’ करता आले तर बघा...
Web Summary : Congress's presence in the MMR region is dwindling. Once strong, the party now lacks impactful programs and active leaders. Internal conflicts and inaction on public issues have led to its decline, needing revitalization.
Web Summary : एमएमआर क्षेत्र में कांग्रेस की उपस्थिति घट रही है। कभी मजबूत रही पार्टी में अब प्रभावशाली कार्यक्रमों और सक्रिय नेताओं की कमी है। आंतरिक संघर्षों और सार्वजनिक मुद्दों पर निष्क्रियता के कारण इसका पतन हुआ है, जिसे पुनर्जीवित करने की आवश्यकता है।