मराठी भाषा कायदा करावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:08 AM2019-10-01T05:08:36+5:302019-10-01T05:08:57+5:30

इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या समाजमागणीमुळे मराठी शाळांना घरघर लागली आहे. या मानसिकतेतून महाराष्ट्राने बाहेर पडण्यासाठी शासनाने ‘मराठी भाषा कायदा’ करून मराठीचा व्यापक प्रचार व प्रसार केला पाहिजे.

Need of Marathi language Act | मराठी भाषा कायदा करावा

मराठी भाषा कायदा करावा

googlenewsNext

- प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे

स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे ‘मराठी राज्य’ म्हणून घोषणा केली. नुसत्या घोषणा करून न थांबता, त्यासाठी वाड्यावस्त्यांवर शाळा सुरू केल्या. आज भारतात शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे; मात्र इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या समाजमागणीमुळे मराठी शाळांना घरघर लागली आहे. या मानसिकतेतून महाराष्ट्राने बाहेर पडण्यासाठी शासनाने ‘मराठी भाषा कायदा’ करून मराठीचा व्यापक प्रचार व प्रसार केला पाहिजे.

महाराष्ट्राचे साहित्य आणि संस्कृती जीवन उदार आहे, हे आपण फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून सिद्ध केले आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्रास स्वतंत्र राज्य बनून ६० वर्षे पूर्ण होतील. हीरकमहोत्सवी ‘माझ्या मनातील महाराष्ट्र’ हा देशातील सर्वच क्षेत्रांतील सर्वोत्तम राज्य म्हणून रुंजी घालतो आहे. शहर आणि खेडे यांतील अंतर आपण केरळसारखे दूर करायला हवे. पंजाबसारखा महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. पश्चिम बंगालसारखे घरोघरी सांस्कृतिक वातावरण हवे. तिथे साहित्य, कला, संगीत, भाषा, निसर्ग हा रोजच्या जीवनाचा भाग आहे. घरोघरी ग्रंथालय आढळते. पूर्वोत्तर भारत म्हणजे प्रतिकूलतेवर मात करीत जगण्याचा वस्तुपाठ. तो धडा आपण गिरवायला हवा. गुजरातने शेती, उद्योग आणि व्यापार अशी त्रिसूत्री पकडून राज्याचा विकास साधला. आपण त्याचे अनुकरण करायला हवे. कर्नाटक बालशिक्षण, मुलींचे शिक्षण प्रथम मानते. राज्यातील रस्ते खड्डेमुक्त हवेत. शिक्षण, प्रशासन, पोलीस, व्यापार, व्यवसायात ‘काय द्यायचे’ राज्य जाऊन ‘कायद्या’चे राज्य यायला हवे.

आपल्याकडे महिला विकास व उत्थानाच्या उंबऱ्यावर तिष्ठत उभ्या आहेत; पण अपेक्षित संधी नाहीत. शेतकरी राजावर दर हंगामात कर्जमाफीची मागणी करण्याची नामुष्की येते. शेतकºयाच्या आत्महत्येची अनिवार्यता आपण कधी समजून घेणार? दरवर्षी अर्धा महाराष्ट्र पुरात वाहून जातो, अर्धा दुष्काळात करपून जातो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांत विकासदरी मोठी आहे. राज्यात सत्ता हे साधन न मानता सेवा बनली पाहिजे.

महाराष्ट्राचे शिक्षण आणि पर्यटन यांचा मेळ आपणास नवमहाराष्ट्राशी जोडता आला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन हा महाराष्ट्राने देशाला दिलेला नवा आचारधर्म आहे. समाज विज्ञाननिष्ठ, ज्ञाननिष्ठ बनवायचा तर त्यास देव, धर्म, दैव, नवस, इतिहास, सनातन वृत्ती यांतून बाहेर काढून तंत्रकुशल आपला हात जगन्नाथ अशी स्वयंप्रेरक, स्वयंसिद्ध आणि स्वकर्तृत्वावर विकास साधणारी नवी युवा पिढी घडवणे आपणा सर्वांचे कर्तव्य ठरते. माझ्या मनातला महाराष्ट्र हा शेतकरी, मजूर, कामगार, वंचित, अल्पसंख्याक यांना विकासाचे अभय देणारा प्रांत आहे. अनाथ, दिव्यांग, वृद्ध, वेश्या, देवदासी, धरणग्रस्त अशा वंचितांच्या विकासाची महाराष्ट्र आदर्शभूमी ठरावी.

महाराष्ट्रास अजूनही महिला मुख्यमंत्री लाभली नाही. समाजाचा दैनंदिन व्यवहार जात, धर्म, पंथ, पक्ष यापलीकडे ‘माणूस’ या निकषावर राहायला हवा. निवडणुकीतील उमेदवाराची निवड जातधर्मापलीकडे जाऊन व्हायला हवी. उद्याच्या हीरकमहोत्सवी महाराष्ट्राचे माझ्या मनातले स्वप्न भारतातील सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ राज्याचे आहे.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Web Title: Need of Marathi language Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.